एटापल्ली पोलिसांचा अवैध जनावर वाहतुकीवर दणका!दोन बारा चाकी वाहनांत तब्बल ८८ जनावरे; चालकांचा जंगलातून फरार
Triveni News Express
प्रतिनिधी : सुगत उराडे
एटापल्ली | २६ ऑगस्ट २०२६
एटापल्ली : नाईट पेट्रोलिंगदरम्यान एटापल्ली पोलिसांनी अवैध जनावर वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली. गुरुपल्ली गावाजवळ दोन संशयित बारा चाकी वाहनांमधून तब्बल ८८ जनावरांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही वाहनचालकांनी वाहने रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत जवळच्या जंगलात पलायन केले. ही कारवाई बुधवार, २६ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता करण्यात आली.
एटापल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई चंद्रशेखर, भूपेंद्र, श्याम मडावी व वट्टी यांचे पथक नाईट गस्त घालत असताना गुरुपल्ली गावाजवळ दोन टाटा बारा चाकी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात जनावरांची संशयित वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ वाहनांचा पाठलाग करून चालकांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकांनी पोलिसांचा इशारा धुडकावून वाहने पुढे नेली. काही अंतरावर दोन्ही वाहने थांबवून चालकांनी खाली उड्या मारल्या आणि जवळील जंगलात पळ काढला. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधाराचा फायदा घेत चालक पसार होण्यात यशस्वी झाले.
यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहनांची झडती घेतली. TS 08 UB 5769 क्रमांकाच्या वाहनात अंदाजे ४० जनावरे, तर AP 16 TE 1238 क्रमांकाच्या वाहनात अंदाजे ४८ जनावरे आढळून आली. दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण ८८ जनावरे आढळली.
घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही वाहने व जनावरे ताब्यात घेतली असून, या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जनावरांची वाहतूक कोठून करण्यात आली, नेमक्या कोणत्या उद्देशाने केली जात होती आणि त्यांना कुठे नेण्यात येत होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पसार झालेल्या वाहनचालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक पायघन व पोलीस पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पायघन करीत आहेत.
