हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या उपस्थितीने जवेली खुर्द येथील कृषी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात; आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर
एटापल्ली:
कृषी विभागाच्या वतीने ‘प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना २०२५-२६’ अंतर्गत एटापल्ली तालुक्यातील जवेली (खुर्द) येथे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या प्रशिक्षण शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी पिकांमध्ये अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच, पिकांवरील कीड व रोगांचे वेळेवर नियंत्रण कसे करावे आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता कशी वाढवावी, याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी, “शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी,” असे आवाहन केले.
या कार्यक्रमास कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि जवेली खुर्द परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
