हेडरी गावात दहा दिवसांपासून वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; महावितरणच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप
एटापल्ली | प्रतिनिधी गिरीश नरोटे
एटापल्ली तालुक्यातील मुख्यालयापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा हेडरी गावात गेल्या दहा दिवसांपासून वीजपुरवठ्याचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू आहे. वारंवार वीज ये-जा करत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असून, महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दहा दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत नसून सतत वीज खंडित होत आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारंवार दूरध्वनीवरून तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. संबंधित कर्मचाऱ्यांकडून “ट्रान्सफॉर्मर बदलावा लागेल” असे गेल्या तीन महिन्यांपासून सांगितले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
ट्रान्सफॉर्मर बदलण्याची आवश्यकता असल्यास संबंधित अभियंत्याने पाहणी करून अहवाल तयार करणे आणि तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी करणे अपेक्षित आहे. मात्र, संबंधित अभियंत्याच्या कथित दुर्लक्षामुळे ही प्रक्रिया रखडली असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सतत कमी-जास्त होणाऱ्या वीजप्रवाहामुळे घरातील पंखे, टीव्ही, फ्रिज, मोटारी तसेच इतर विद्युत उपकरणे खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. उपकरणे जळाल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांनाच सहन करावा लागणार आहे.
विशेष म्हणजे, हेडरी गाव एटापल्ली मुख्यालयापासून अगदी जवळ असतानाही महावितरणचे कर्मचारी अद्याप प्रत्यक्ष गावात येऊन परिस्थितीची पाहणी करत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यालयालगतच्या गावाची ही अवस्था असेल, तर दुर्गम भागातील ४० ते १०० किलोमीटर अंतरावरील गावांच्या वीज समस्यांकडे महावितरण किती गांभीर्याने पाहत असेल, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दहा दिवसांपासून सातत्याने तक्रारी करूनही “आज-उद्या” करत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महावितरणच्या कथित निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना उकाडा, अंधार आणि आर्थिक नुकसानाचा धोका सहन करावा लागत आहे.
हेडरी गावातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, खराब ट्रान्सफॉर्मर बदलून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
