शाळा भरलीच नाही! एटापल्ली तालुक्यातील चोखेवाडा जि. प. शाळेत शिक्षक अनुपस्थित; विद्यार्थ्यांचा हिरमोड
एटापल्ली (विशेष प्रतिनिधी): गिरीश नरोटे
तालुका मुख्यालयापासून अवघ्या ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा चोखेवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नेहमीप्रमाणे सकाळी उत्साहाने शाळेत पोहोचलेल्या चिमुकल्यांना शिक्षकच अनुपस्थित असल्याने माघारी फिरावे लागले.
आज सकाळी विद्यार्थी गणवेश घालून वेळात शाळेत पोहोचले. मात्र, उशिरापर्यंत एकही शिक्षक शाळेत आला नाही. बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतर शिक्षक आज येणार नाहीत आणि शाळा बंदच राहील, असे समजून हिरमोड झालेले विद्यार्थी शेवटी घराकडे परतले. ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जाहून प्रशासनाचा किती ढिसाळ कारभार सुरू आहे, याचेच हे जिवंत उदाहरण मानले जात आहे.
”आमची मुले शिक्षणासाठी शाळेत जातात, पण जर शिक्षकच दांडी मारणार असतील तर मुलांचे भविष्य काय?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. आजच्या या गैरहजेरीबद्दल शिक्षकाला जाब विचारायचा कोणी, असा यक्षप्रश्न पालकांना पडला आहे.
या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन गट शिक्षण अधिकारी (BDO), पंचायत समिती एटापल्ली यांनी चोखेवाडा शाळेतील शिक्षकांच्या या बेजबाबदारपणाची तात्काळ चौकशी करावी आणि संबंधित कामचुकार शिक्षकांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.
