चोखेवाडा येथे तलाठी सतत गैरहजर; ग्रामस्थ त्रस्त, तहसीलदार व एटापल्ली तलाठी कार्यालयाला दिले निवेदन
एटापल्ली (विशेष प्रतिनिधी): गिरीश नरोटे
एटापल्ली तालुक्यातील मुख्यालयीपासून सुमारे ३३ किमी अंतरावर असलेल्या मौजा चोखेवाडा (साजा क्र. ०५) येथील तलाठी नियमित गैरहजर राहत असल्याने नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. शासकीय दाखले, महसुली कामे व इतर अत्यावश्यक कागदपत्रांसाठी दररोज साजा कार्यालयात येणाऱ्या ग्रामस्थांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
गावात तलाठी कार्यालयाची स्वतंत्र इमारत असूनही हे कार्यालय बहुतांश वेळ कुलूपबंदच असते. त्यामुळे “या बेजबाबदार तलाठ्याला प्रश्न विचारणार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तलाठ्याच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचे शासकीय कामात मोठे नुकसान होत आहे.
या गंभीर समस्येची तत्काळ दखल घेऊन चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित तलाठ्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज ग्रामस्थांच्या वतीने एटापल्ली येथील तलाठी व तहसील कार्यालयात लेखी निवेदन देण्यात आले. निवेदन सादर करताना चोखेवाडा गावातील प्रमुख नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसील प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
