सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा झिंगानूर येथे विविध स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
झिंगानूर (ता. सिरोंचा): रामचंद्र कुम्मरी
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, झिंगानूर येथे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम व आरोग्य तपासणी शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी पार पडला.
अभियानाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता’, ‘पर्यावरण संरक्षण’, ‘विकसित भारत’, ‘शिक्षण’ आणि ‘आरोग्य’ यांसारख्या सामाजिक विषयांवर आकर्षक चित्रे रेखाटून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
त्यानंतर २१ सप्टेंबर २०२६ रोजी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात आली. यात प्रामुख्याने ॲनिमिया, सिकलसेल व रक्ताच्या इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्यांचा समावेश होता. आरोग्य अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना योग्य आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले.
महिनाभर चालणाऱ्या या अभियानात चित्रकला, रांगोळी, निबंध लेखन, वक्तृत्व, क्रीडा स्पर्धा व विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. आर. कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक व स्थानिक नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
