मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
ग्रामस्थांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
पावसाळ्यात दळणवळणाचा प्रश्न गंभीर; अपघातांचा धोका वाढला
प्रतिनिधी : सुगत उराडे
एटापल्ली (२१ सप्टेंबर २०२६):
कसनसूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मुसरामगुडा गावातील मुख्य गिट्टी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने विशेष दुरुस्ती करून नवीन डांबरीकरण किंवा सिमेंट रस्ता करण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२१ सप्टेंबर २०२६ रोजी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा मुसरामगुडा यांच्या वतीने एटापल्ली सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना हे निवेदन सोपवण्यात आले. मुसरामगुडा गावासाठी तसेच तालुक्याशी संपर्क साधण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रस्त्यावर खड्डेच खड्डे; अपघाताचा धोका वाढला
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मुख्य गिट्टी रस्ता अक्षरशः उखडून गेला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी अस्ताव्यस्त पसरली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे व खडबडीत भाग निर्माण झाले आहेत. यामुळे दुचाकीस्वारा घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः महिला, वृद्ध नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या मार्गावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शिक्षण, आरोग्य व बाजारपेठेसाठी हाच मुख्य मार्ग
मुसरामगुडा हे कसनसूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महत्त्वाचे गाव असून, दैनंदिन गरजा, शासकीय कामे, शिक्षण, आरोग्यसेवा आणि बाजारपेठेसाठी ग्रामस्थांना याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने नागरिकांच्या दळणवळणावर त्याचा थेट परिणाम होत असून, पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर बनते.
तात्पुरती डागडुजी नको; कायमस्वरूपी उपाय करा
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून विशेष दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ खडी टाकून तात्पुरती डागडुजी न करता नवीन डांबरीकरण किंवा सिमेंट रस्त्याचे दर्जेदार बांधकाम करण्यात यावे, अशी ठाम अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभेच्या या निवेदनामुळे मुसरामगुडा येथील रस्त्याचा गंभीर प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग यावर काय कार्यवाही करतो, याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
