प्रज्ञाशोध परीक्षेत देव गोंगले याचे घवघवीत यश
प्रज्ञाशोध परीक्षेत देव गोंगले याचे घवघवीत यश
जिद्द, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी
गडचिरोली | प्रतिनिधी : तिरुपती मडावी
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वतीने २५ एप्रिल २०२६ रोजी राणी दुर्गावती कन्या शाळेत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (MTS) मध्ये भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा, राजाराम (खां.) येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी देव मधुकर गोंगले याने जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले.
देव गोंगले हा सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असून, त्याच्या यशामागे आई-वडिलांसह शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्याची आई लताबाई मधुकर गोंगले व वडील मधुकर गोंगले, राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष, यांनी त्याला अभ्यासासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले.
देवच्या शैक्षणिक वाटचालीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीचे शिक्षक रामदास उघाडे सर यांचे गणित विषयातील मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यानंतर जी. के. मडावी सर यांनी गणित विषयात सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले. गणित हा देवचा आवडता विषय असून, या विषयात त्याने नेहमीच चांगली कामगिरी केली.
आपल्या यशाचे श्रेय सांगताना देवने इंदाराम येथील मामा इम्रानखान पठाण तसेच आत्या फरीन इम्रानखान पठाण यांच्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख केला. अभ्यासाबाबत सातत्याने मार्गदर्शन आणि सुख-दुःखात मिळालेली साथ ही आपल्या वाटचालीतील महत्त्वाची प्रेरणा असल्याचे त्याने सांगितले. तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळेतील सर्व शिक्षकांचेही त्याने आभार मानले.
यानंतर देवने भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा, राजाराम (खां.) येथे इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतला. येथे गणित विषयाचे शिक्षक सुदर्शन वासाडे सर यांनी त्याला नियमित अभ्यास, गृहपाठ आणि सरावासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षकांनी दिलेला गृहपाठ देवने कर्तव्यपूर्वक पूर्ण करण्यावर भर दिला. या सातत्यपूर्ण सरावाचा फायदा प्रज्ञाशोध परीक्षेच्या तयारीत झाला.
या यशासाठी मुख्याध्यापक टी.सी. ओड्नलवार सर, सुदर्शन वासाडे सरांसह शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभले.
देव गोंगलेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनीही मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवू शकते, हे देवच्या कामगिरीने अधोरेखित केले आहे.
