गडचिरोली : ५% अबंध निधीचे नियोजन व खर्चाचे अधिकार ग्रामसभेलाच ठेवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
अहेरी : तिरुपति मडावी
तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांचा ५% अबंध निधी (पेसा निधी) नियोजन आणि खर्च करण्याचे कायदेशीर अधिकार केवळ ग्रामसभेलाच आहेत. हे अधिकार अबाधित ठेवावेत, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, गडचिरोलीच्या वतीने अहेरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एम. एस. वाढई यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील अनेक पेसा गावांमध्ये नागरिक अशिक्षित असल्याने आणि त्यांना शासकीय परिपत्रकांची पुरेशी माहिती नसल्याने काही अधिकारी याचा गैरफायदा घेतात. नियमांमध्ये बदल झाल्याची चुकीची माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
शासनाने अबंध निधी संदर्भात असा कोणताही नवीन सुधारित नियम किंवा परिपत्रक जारी केले असल्यास, त्याची अधिकृत प्रत प्रत्येक गावाच्या ग्रामसभेला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. यासोबतच ५% अबंध निधीच्या नियोजन व खर्चाबाबत ग्रामपंचायत अधिकारी, तालुका पेसा समन्वयक, ग्रामसभा कोष समिती आणि प्रत्यक्ष ग्रामसभेला नेमके किती व कोणते अधिकार आहेत, याची सविस्तर लेखी माहिती जाहीर करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव बालाजी गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, तसेच पक्षाचे कार्यकर्ते रितेश गावडे व सलीम शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
