चोखेवाडा येथे ग्रामसभेचे आयोजन; आठ गावांतील रस्ते, शाळा व विजेच्या बिकट समस्यांवर सविस्तर चर्चा
एटापल्ली (जि. गडचिरोली) :
तालुक्यातील मुख्यालयापासून ३३ किमी अंतरावर असलेल्या मौजा चोखेवाडा येथे आज ग्रामसभेचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत चोखेवाडा ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या आठ गावांमधील रस्ते, शाळा, वीज, पाणी आणि मूलभूत सुविधांच्या बिकट समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व समस्यांसंदर्भात एटापल्लीचे गटविकास अधिकारी, तहसील कार्यालय तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) कार्यालयाला निवेदन सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभेत घेण्यात आला.
सदर ग्रामसभा चोखेवाडाचे पोलीस पाटील श्री. येशू दानू नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी चोखेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. लालसू मनकु नरोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे माजी प्रकल्प अधिकारी श्री. मट्टामी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सचिन मोतकुलवार, श्री. सुरज जखलवार उपस्थित होते. सोबतच प्रतिष्ठित नागरिक श्री. किरण नरोटे, श्री. देवराव नरोटे, श्री. अर्जुन हिचामी, श्री. देवराव मट्टामी, श्री. राकेश मट्टामी, श्री. सैनु झोरे, श्री. अंकुश गावडे, चोखेवाडाचे तलाठी श्री. कुशल उसेंडी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या विविध गावांतील प्रमुख समस्या :
१. चोखेवाडा :
शाळेची दुरवस्था व शिक्षकांची टंचाई : स्थानिक जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीची तोडफोड झाली असून १ ते ५ वी पर्यंतच्या वर्ग खोल्यांची दुरवस्था आहे. अवघ्या १३ विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या या शाळेत फक्त एकच शिक्षक कार्यरत आहेत, ज्यांच्याकडे कोतरी येथील शाळेचाही पदभार आहे. एकाच शिक्षकाला १ ते ५ वर्ग सांभाळणे कठीण जात आहे.
किचन रूम : शाळा व अंगणवाडीच्या स्वयंपाकगृहांची (किचन रूम) तोडफोड झाली असून दरवाजेही नाहीत; दुरुस्तीची तातडीची गरज आहे.
इतर समस्या : गंजलेले विद्युत खांब बदलणे, नवीन नाली बांधकाम, तसेच चोखेवाडा ते टोला, चोखेवाडा ते मगदंडी आणि चोखेवाडा ते रेगडीगुट्टा या रस्त्यांचे तातडीने बांधकाम.
२. मगदंडी :
गावाला जोडणाऱ्या चोखेवाडा-मगदंडी रस्त्याची गरज.
गावात सी.सी. रोडचा अभाव.
जि.प. उच्च प्राथमिक शाळेची गळती असलेली इमारत दुरुस्त करणे.
गोटुल भवन उभारणे व सौ. कोतले हिचामी यांच्या घरासमोरील नादुरुस्त बोरवेल हातपंप दुरुस्त करणे.
३. कोईदूळ :
चोखेवाडा ते कोईदूळ रस्त्याची आणि नदीवर पुलाची तातडीची गरज.
कण्हाळगाव ते कोईदूळ (२ किमी) आणि कोईदूळ ते नेनगुडा (२ किमी) रस्त्यांचे काम.
४. गडदापली :
कोईदूळ-गडदापली-रेकनार रस्ता निर्माण करणे.
गुमडी ते येडमपली स्टेट हायवे ३६३ ची दुरुस्ती आणि विकासपली ते गडदापली (२ किमी) रस्ता तयार करणे.
५. रेगडीगुट्टा :
चोखेवाडा ते रेगडीगुट्टा (२.५० किमी) रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करणे.
६. रेकनार :
गेल्या ३ वर्षांपासून गावात वीज पुरवठा खंडित आहे.
रेकनार ते आलेंगा रस्त्याची गरज आणि गावात सी.सी. रोडचा अभाव.
७. गुमडी :
अंगणवाडी इमारतीचा अभाव.
गेल्या ४ वर्षांपासून वीज नाही; अंधाराचे साम्राज्य.
सी.सी. रोड व पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीची गरज.
८. मंडोली :
अवघी ४-५ घरे व २०-२५ लोकसंख्या असलेल्या या छोट्या गावासाठी मंडोली ते गडदापली (५ ते ६ किमी) रस्त्याची अत्यंत आवश्यकता.
ग्रामीण भागातील या बिकट समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या सर्व समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी लवकरच संबंधित विभागांना अधिकृत निवेदन देण्यात येणार असल्याचे ग्रामसभेत ठरवण्यात आले.
