गडचिरोली : अतिदुर्गम भामरागडला विकासाचा वेग; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आरोग्य, शिक्षण व रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश
विशेष प्रतिनिधी |
अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि घरकुल यांसारख्या मूलभूत सुविधा वेळेत मिळाव्यात, यासाठी प्रशासकीय यंत्रणेने अधिक समन्वयाने आणि गतिमानतेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लाहेरी, होड्री व हेमलकसा या भागांचा प्रत्यक्ष दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली.
आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश व चाव्यांचे वाटप
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा व आयोजित आरोग्य शिबिराची पाहणी केली. दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. याच कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या असून प्रलंबित घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
होड्रीतील बेली ब्रिज व जिल्हा परिषद शाळेची पाहणी
होड्री येथील बेली ब्रिजची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी पूल व रस्त्यांशी संबंधित प्रलंबित कामांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. त्यानंतर त्यांनी तेथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शैक्षणिक सोयी-सुविधांवर विशेष भर देण्याचे त्यांनी सांगितले.
हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला भेट
आपल्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी हेमलकसा येथील प्रसिद्ध ‘लोकबिरादरी प्रकल्पाच्या’ शाळेलाही भेट दिली. तेथील उपक्रम आणि शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेत त्यांनी कौतुक केले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना समन्वय ठेवण्याचे आवाहन
भामरागडची भौगोलिक दुर्गमता लक्षात घेता सर्व विभागांनी आपापसातील समन्वय वाढवून विकासकामांना गती द्यावी, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला.
या पाहणी दौऱ्यात एटापल्लीचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत, भामरागडचे उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, तहसीलदार किशोर बागडे यांच्यासह विविध विभागांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
