एटापल्ली तालुक्यातील चोखेवाडा ग्रामसभेत ८ गावांतील नागरी समस्यांवर वादळी चर्चा; प्रशासनाला निवेदन देण्याचा निर्णय
तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली (गडचिरोली):
एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ३३ किमी अंतरावर असलेल्या मौजा चोखेवाडा येथे नुकतीच विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत चोखेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आठ गावांतील रस्ते, शाळा, वीज, पाणी व इतर मूलभूत सुविधांच्या गंभीर समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी चोखेवाडा येथील गाव पोलीस पाटील श्री. येशू दानू नरोटे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये चोखेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. लालसू मनकु नरोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे माजी प्रकल्प अधिकारी श्री. मट्टामी साहेब, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सचिन मोतकुलवार व श्री. सुरज जखलवार उपस्थित होते.
याशिवाय गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. किरण नरोटे, श्री. देवराव नरोटे, श्री. अर्जुन हिचामी, श्री. देवराव मट्टामी, श्री. राकेश मट्टामी, श्री. सैनु झोरे, श्री. अंकुश गावडे, चोखेवाडाचे तलाठी श्री. कुशल उसेंडी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठ गावांतील मुख्य समस्या आणि मागण्या:
१. चोखेवाडा:
शाळेची दुरवस्था: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची इमारत पडझड झाली असून, १ ते ५ व्या वर्गातील सर्व १३ विद्यार्थ्यांना ऑफिसच्या एकाच खोलीत बसावे लागत आहे. शाळेत फक्त एकच शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे ‘कोतरी’ येथील शाळेचा अतिरिक्त प्रभार आहे. एकाच शिक्षकाला सर्व वर्ग सांभाळणे अशक्य होत आहे.
इमारतींची तोडफोड: शाळा व अंगणवाडीचे किचन रूम उद्ध्वस्त झाले असून दरवाजाही नाही, त्यामुळे तातडीने दुरुस्तीची गरज आहे.
इतर समस्या: गंजलेले विद्युत खांब बदलणे, नवीन नाली बांधकाम, तसेच चोखेवाडा ते चोखेवाडा टोला, मगदंडी व रेगडीगुट्टा या रस्त्यांचे बांधकाम.
२. मगदंडी:
चोखेवाडा ते मगदंडी रस्ता व गावात सी.सी. रोडची आवश्यकता.
गळक्या जि.प. प्राथमिक शाळेची दुरुस्ती.
गोटुल भवन उभारणी आणि सौ. कोतले हिचामी यांच्या घरासमोरील हातपंपाची (बोरवेल) दुरुस्ती.
३. कोईदूळ:
चोखेवाडा ते कोईदूळ रस्ता व नदीवर पुलाचे बांधकाम.
कनहाळगाव ते कोईदूळ (२ किमी) आणि कोईदूळ ते नेनगुडा (२ किमी) रस्त्यांची निर्मिती.
४. गडदापली:
कोईदूळ-गडदापली-रेकनार रस्ता जोडणी.
गुमडी ते येडमपली स्टेट हायवे ३६३ सुधारणा व विकासपली ते गडदापली (२ किमी) रस्ता.
५. रेगडीगुट्टा:
चोखेवाडा ते रेगडीगुट्टा (२.५० किमी) रस्त्याची अत्यंत गरज.
६. रेकनार:
गेल्या ३ वर्षांपासून गावात वीज नाही, गावात सी.सी. रोड नाही आणि रेकनार ते आलेंगा रस्त्याची तातडीची गरज.
७. गुमडी:
अंगणवाडी इमारतीचा अभाव व पिण्याच्या विहिरीची गरज.
गेल्या ४ वर्षांपासून गावात वीज नाही व गावात सी.सी. रोडचा अभाव.
८. मंडोली:
केवळ ४ ते ५ घरे आणि २० ते २५ लोकसंख्या असलेल्या या छोट्या गावात जाण्यासाठी मंडोली ते गडदापली (५ ते ६ किमी) रस्त्याची मागणी.
प्रशासनाला निवेदन देणार
ग्रामसभेत आठही गावांतील नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या सर्व नागरी समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी गटविकास अधिकारी (पंचायत समिती, एटापल्ली), तहसील कार्यालय (एटापल्ली) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO कार्यालय, एटापल्ली) यांना लवकरात लवकर सविस्तर निवेदने सादर करून मागण्या मान्य करून घेण्याचा एकमुखी निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला.
