एटापल्ली तालुक्यातील चोखेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेची दैना; एकाच शिक्षकावर दोन शाळांचा भार आणि मोडकळीस आलेली इमारत
एटापल्ली (तालुका प्रतिनिधी: गिरीष डी. नरोटे):
स्वातंत्र्याला तब्बल ८० वर्षे पूर्ण होत आली तरी अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील शिक्षणाची दुरवस्था कायम असल्याचे चित्र समोर येत आहे. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ३३ किमी अंतरावर असलेल्या मौजा चोखेवाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गंभीर शैक्षणिक समस्या निर्माण झाली असून, शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे.
शाळेच्या इमारतीची तोडफोड; एकाच वर्गात भरतो १ ते ५ वीचा वर्ग
चोखेवाडा येथील जि. प. शाळेच्या इमारतीची आणि किचन शेडची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे. किचन रूमला दरवाजासुद्धा उरलेला नाही. इमारत सुरक्षित नसल्यामुळे अखेर ऑफिसच्या एकाच खोलीत १ ली ते ५ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसवून धडे दिले जात आहेत.
एक शिक्षक, १३ विद्यार्थी आणि दोन शाळांचा भार
शाळेत एकूण १३ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. मात्र, या सर्व विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी संपूर्ण शाळेत अवघे एकच शिक्षक कार्यरत आहेत. ५ वेगवेगळ्या वर्गांना एकाच वेळी एकाच शिक्षकाने शिकवणे व्यवहार्य नसताना, प्रशासनाने या एकमेव शिक्षकाकडे लगतच्या कोतरी गावातील जि. प. उच्च प्राथमिक शाळेचाही अतिरिक्त प्रभार सोपवला आहे. एकाच शिक्षकाने दोन-दोन शाळा कशा सांभाळाव्यात आणि ५ वर्गांतील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण कसे द्यावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शासकीय अनास्थेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
“दुर्गम भागातील शाळांची अवस्था बिकट असून शासन मात्र गाढ झोपेत आहे,” अशी तीव्र भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अशा मोडकळीस आलेल्या इमारतीत आणि संसाधनांच्या अभावात शिक्षक तरी विद्यार्थ्यांना कसे घडवणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चोखेवाडा गावातील ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने खालील मागण्या केल्या आहेत:
शाळेची मुख्य इमारत आणि किचन रूमची तत्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी.
शाळेला पूर्णवेळ स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून देऊन कोतरी शाळेचा अतिरिक्त प्रभार हटवण्यात यावा.
अतिदुर्गम भागातील गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून शिक्षण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्वरित उपाययोजना करावी, अशी आग्रही विनंती चोखेवाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे
