भामरागड तालुक्याला पुराचा धोका; इंद्रावतीने ओलांडली धोका पातळी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गडचिरोली / भामरागड (प्रतिनिधी – गिरीष डी. नरोटे):
छत्तीसगड राज्यातील इंद्रावती नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यता वर्तवण्यात आली आहे. जगदलपूर व चिंदनार सरिता मापन केंद्रांवरील नोंदींनुसार इंद्रावती नदीने धोका पातळी ओलांडली आहे.
तसेच काल सायंकाळपासून लाईव्ह रडारच्या नोंदीनुसार पर्लकोटा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे इंद्रावती व पर्लकोटा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ होऊन भामरागड तालुक्यातील सखल भागात पूर येण्याचा धोका वाढला आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना:
अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश: भामरागड तालुक्यातील सर्व संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात हजर राहून तात्काळ पूर्वदक्षता व आपत्कालीन उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांना आवाहन: इंद्रावती आणि पर्लकोटा नदीकाठच्या, सखल भागातील तसेच पूरप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पूर्ण सतर्क राहावे.
सुरक्षिततेचे उपाय: नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात किंवा पाण्याच्या वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात उतरू नये, तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
पुराची संभाव्य परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
