जारावंडी येथे अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सभा; वनहक्क दावे सादर करण्याचे आवाहन
जारावंडी : एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेत वनहक्क दावे सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी वनहक्क दावे लवकरात लवकर सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले. तसेच मा. उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांनी दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी वनहक्क दावे सादर करण्यासंदर्भात घेतलेल्या सभेत दिलेल्या मार्गदर्शनाची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.
वनहक्क दाव्यांसाठी आवश्यक कागदपत्रे, दावा सादर करण्याची प्रक्रिया तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दावे कसे तयार करावेत, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे परिसरातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांमध्ये वनहक्क दावे सादर करण्याबाबत जनजागृती झाली.
या सभेला जारावंडी परिसरातील मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक शेतकरी बांधव उपस्थित होते. उपस्थितांनी वनहक्क दावे सादर करण्याची तयारी दर्शवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त केला.
तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली, जि. गडचिरोली
