परसलगोंदी ग्रामसभेचा एल्गार! जल, जंगल, जमीन आणि वनहक्कांच्या संरक्षणासाठी संघर्षाचा निर्धार
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय कोणताही प्रकल्प, सर्वेक्षण किंवा कारवाई नको; पेसा कायदा व वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्थांची ठाम भूमिका
प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. ३ नोव्हेंबर २०२६
एटापल्ली : तालुक्यातील परसलगोंदी येथे सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण ग्रामसभा पार पडली. या सभेत जल, जंगल, जमीन आणि सामूहिक वनहक्कांच्या संरक्षणासह ग्रामसभेच्या घटनात्मक अधिकारांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामसभेची पूर्वसंमती घेतल्याशिवाय गावाच्या हद्दीत कोणताही प्रकल्प, सर्वेक्षण अथवा संबंधित कारवाई करण्यात येऊ नये, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेचे अधिकार, पेसा कायदा तसेच वनहक्क अधिनियम २००६ आणि सुधारित नियम २०१२ याबाबत ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सामूहिक वनहक्क (CFR) अंतर्गत ग्रामसभेला प्राप्त झालेल्या अधिकारांचा प्रभावी वापर करून गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामसभेची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
ग्रामसभेच्या संमतीशिवाय प्रकल्प राबवू नका!
ग्रामसभेची पूर्वसंमती न घेता कोणत्याही प्रकारचे प्रकल्प, सर्वेक्षण किंवा अन्य प्रक्रिया राबविण्यात येऊ नयेत, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली. जल, जंगल आणि जमीन ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून आदिवासी समाजाच्या जीवनाचा आणि अस्तित्वाचा आधार आहे. त्यामुळे या संसाधनांबाबत निर्णय घेताना ग्रामसभेच्या अधिकारांचा सन्मान राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ग्रामसभेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या तसेच कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
जमीन व्यवहारांवर ग्रामसभेचे लक्ष
जमीन विक्री-खरेदीच्या व्यवहारांबाबतही ग्रामसभेत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. नियमबाह्य जमीन व्यवहार, बनावट कागदपत्रांचा वापर अथवा कायद्याचे उल्लंघन करून होणाऱ्या व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
वनहक्कांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थ एकजूट
भारतीय संविधानातील अनुसूचित क्षेत्रासंबंधी तरतुदी, पेसा कायदा आणि वनहक्क अधिनियमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला प्राप्त झालेल्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामसभा एकजुटीने पुढाकार घेणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सामूहिक वनसंपत्तीचे जतन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि ग्रामसभेच्या स्वायत्त अधिकारांचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली.
प्रमुख उपस्थिती
सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबन मंगु मट्टामी आणि सचिव रावजी देवू मट्टामी यांच्यासह समितीचे सदस्य विनोद अडवे पदा, रितेश बाजू जोई, चंदु सैनु गावडे, सरिता कोपा पदा, मैनी दुलसा पदा, रमेश झुरू जोई, कुटा लालसु मट्टामी, कोमठी कुल्ले गावडे, सत्तू पुसु पदा, कोको लुला गावडे, वसंत गोंगलू मट्टामी आणि आशिष दिलीप मट्टामी उपस्थित होते. याशिवाय गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सभेला उपस्थिती दर्शविली.
