⚡ वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून महावितरणला घेराव!
वीज ग्राहकांच्या समस्यांवर नागरिक आक्रमक; वाढीव बिल रद्द करण्याची जोरदार मागणी
पंदेवाही-बुर्गी जि.प. क्षेत्रातील वीज समस्या तातडीने सोडविण्याची मागणी; अन्यथा महावितरण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
एटापल्ली | प्रतिनिधी : सुगत उराडे दि. ३ नोव्हेंबर २०२६
एटापल्ली : पंदेवाही-बुर्गी जिल्हा परिषद क्षेत्रातील वीज ग्राहकांच्या विविध समस्यांवरून नागरिकांनी महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी व्होल्टेज आणि अवाजवी वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी एटापल्ली येथील महावितरण कार्यालयाकडे निवेदन सादर करून प्रशासनाला जाब विचारला. वाढीव वीज बिलांची तपासणी करून चुकीची आकारणी रद्द करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
गेल्या काही काळापासून परिसरातील गावांमध्ये वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडचणींचा सामना करावा लागत आहे. कमी व्होल्टेजमुळे घरगुती विद्युत उपकरणांच्या वापरावरही परिणाम होत आहे. विशेषतः शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतीच्या कामांवर विपरीत परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
एकीकडे वीजपुरवठ्याची अनियमितता आणि दुसरीकडे अपेक्षेपेक्षा अधिक रकमेची वीज बिले ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या वीज बिलाची योग्य तपासणी करून चुकीची व वाढीव आकारणी तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
वाढीव वीज बिलांची तपासणी करून चुकीची आकारणी रद्द करावी.
वीज दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा.
शेतकऱ्यांना नियमित व सुरळीत वीजपुरवठा करावा.
वीज बिलांमधील त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात.
वीज ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करावे.
या मागण्यांकडे महावितरण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी हर्षवर्धन बाबा आत्राम (माजी पंचायत समिती सदस्य, अहेरी), रामजी कत्तीवार (माजी जिल्हा परिषद सदस्य), सुगत उराडे (सामाजिक कार्यकर्ते), संभा हिचामी (राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष), पौर्णिमाताई श्रीरामवार (महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, एटापल्ली), संजूभाऊ चरडूके (माजी जिल्हा परिषद सदस्य, गडचिरोली), विनोद हिचामी (बुर्गी), गोसुजी हिचामी (गाव पाटील, बुर्गी), सुरेश मडावी (गाव पाटील, करपणफुंडी), उमेश मडावी (ग्रामपंचायत सदस्य, येमली), तेजराव खोब्रागडे (येमली), किसनजी नरोटे (उडेरा), संजय चल्लावार (करपणफुंडी) यांच्यासह पंदेवाही-बुर्गी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
वीज ग्राहकांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करून त्यांना दिलासा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार, अशी ठाम भूमिका उपस्थितांनी व्यक्त केली. आता नागरिकांच्या या मागण्यांवर महावितरण प्रशासन कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्षात किती लवकर उपाययोजना करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
