पार्श्वभूमीवर रस्त्याची डागडुजी; गिट्टीमुळे दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात!
सिरोंचा–छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर स्कुटी घसरून दोन मुली पडल्या; सुदैवाने जीवितहानी नाही, किरकोळ दुखापत
अधिकारी आणि नेत्यांच्या दौऱ्यापुरतीच रस्त्यांची रंगरंगोटी कशासाठी? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?
सिरोंचा | सपांदक सुरेश तिपट्टीवार
सिरोंचा ते छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, आरडा ते राजन्नापल्लीदरम्यान करण्यात आलेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे दुचाकीस्वारांची कसरत सुरू झाली आहे. आज दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास गिट्टी टाकलेल्या रस्त्यावरून स्कुटीने घरी जाणाऱ्या दोन मुलींची स्कुटी घसरून दोघीही खाली पडल्या. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र दोघींना किरकोळ दुखापत झाली.
राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात जड व अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. आरडा ते राजन्नापल्लीदरम्यान सुमारे २०० मीटर रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले होते. याचदरम्यान महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा सिरोंचा तालुक्यात दौरा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने उखडलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी गिट्टी व जीएसबी टाकून तात्पुरती डागडुजी केली.
मात्र, या डागडुजीमुळे जड वाहनांची ये-जा सुरू असली तरी दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. सैल गिट्टीवरून दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज घडलेला अपघात ही त्याचीच गंभीर जाणीव करून देणारी घटना आहे.
दौऱ्यापुरती डागडुजी की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी काम?
एखादा नेता किंवा वरिष्ठ शासकीय अधिकारी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळताच संबंधित विभागाकडून रस्त्यांची साफसफाई, डागडुजी आणि रंगरंगोटीची लगबग सुरू होते. मात्र, दौरा संपल्यानंतर याच रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो, याकडे लक्ष देणार कोण?
मोठ्या अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी आणि दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती कामे करून वाहवा मिळविण्यापेक्षा नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. अशा घाईघाईने केलेल्या डागडुजीमुळे एखादा मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे!
आरडा ते राजन्नापल्लीदरम्यान उखडलेल्या रस्त्याचे दर्जेदार व कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, रस्त्यावर पसरलेली सैल गिट्टी तातडीने हटवावी किंवा योग्य प्रकारे दाबून रस्ता सुरक्षित करावा. तसेच काम पूर्ण होईपर्यंत आवश्यक सुरक्षा उपाययोजना व सूचना फलक लावावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.
आज दोन मुली किरकोळ जखमी झाल्या; उद्या एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
