नैताला गावाला स्वतंत्र गाव म्हणून घोषित करण्यासाठी ग्रामसभेचा एकमताने ठराव!
पेसा कायदा १९९६ अंतर्गत स्वतंत्र गावाच्या मान्यतेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार; ७७ महिला-पुरुषांची विशेष ग्रामसभेला उपस्थिती
गडचिरोली | एटापल्ली तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत गट्टेवाडा अंतर्गत येणाऱ्या नैताला गावात दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पेसा कायदा १९९६ व महाराष्ट्र पेसा नियम २०१४ अंतर्गत गावाला स्वतंत्र गाव म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी विशेष रूढी-परंपरा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थित ७७ महिला व पुरुष ग्रामस्थांनी गावाच्या स्वतंत्र सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक ओळखीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून स्वतंत्र गावाच्या मान्यतेसाठी एकमताने ठराव मंजूर केला.
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान श्री. बारसू विजा उईके यांनी भूषविले. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या विशेष सभेत नैताला गावाला स्वतंत्र गाव म्हणून मान्यता देण्याच्या विषयावर ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
सभेदरम्यान ग्रामस्थांनी सांगितले की, नैताला गाव हे मुख्य गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असून, या वस्तीची स्वतःची स्वतंत्र सांस्कृतिक, सामाजिक व पारंपरिक ओळख आहे. गावातील नागरिक आपल्या रूढी, परंपरा, चालीरीती आणि प्रथांनुसार सामाजिक व्यवहार व गावकारभार पार पाडत असतात.
पेसा कायदा १९९६ मधील कलम ४(अ) नुसार अनुसूचित क्षेत्रातील एखादी वस्ती, पाडा किंवा वस्त्यांचा समूह, जिथे लोक राहतात आणि स्वतःच्या परंपरा व चालीरीतींनुसार आपले व्यवहार चालवतात, अशा वस्तीला स्वतंत्र गाव म्हणून मान्यता देण्याची तरतूद असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी मांडला.
तसेच स्वतंत्र गाव म्हणून मान्यता मिळाल्यास ग्रामसभेच्या अधिकारांना बळकटी मिळून सामूहिक वनहक्क, गौण खनिज, गौण वनोपज तसेच नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनासंबंधी अधिकार अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल. याशिवाय गावाच्या विकासासाठी मिळणारा शासकीय निधी व योजनांचा लाभ थेट गावाच्या विकासासाठी वापरण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.
एकमताने ठराव मंजूर
दीर्घ चर्चेनंतर नैताला गावाला पेसा कायदा १९९६ व महाराष्ट्र पेसा नियम २०१४ अंतर्गत स्वतंत्र गाव म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचा ठराव उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला.
या ठरावामुळे नैताला गावाच्या स्वतंत्र अस्तित्वाची, पारंपरिक संस्कृतीची आणि ग्रामसभेच्या स्वायत्त अधिकारांची जपणूक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. आता संबंधित प्रशासनाकडून या ठरावावर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
