परसलगोंदी येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी!
मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी संस्कृती, जल-जंगल-जमीन आणि समाजाच्या हक्कांच्या लढ्याला उजाळा; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
गडचिरोली | एटापल्ली | प्रतिनिधी : सुगत उराडे
परसलगोंदी येथे रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी महान क्रांतिकारक, जननायक तथा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनकार्याचे स्मरण करून आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याला उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील भूमिया तथा वनहक्क समितीचे अध्यक्ष मा. बनन मटामी होते. तर उपाध्यक्ष म्हणून गावचे पोलीस पाटील मा. दिलीप मटामी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. मोहन उसेंडी (गाव कोतवाल), श्री. गणेश मठामी (कृषी सहाय्यक), श्री. मिरगु उसेंडी (शिक्षक), शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. चंदुजी गावडे आणि उपाध्यक्ष मा. उमेशजी मठामी उपस्थित होते.
यावेळी विनोद पदा, कोमटी गावडे, दलसु जाई, राजू मूळमा, साधू पदा यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ मंडळी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या विचारांचा जागर
भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे, अस्मितेचे आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक आहेत. त्यांनी जल, जंगल आणि जमीन या नैसर्गिक साधनसंपत्तीवरील आदिवासी समाजाच्या पारंपरिक हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध ऐतिहासिक लढा उभारला. समाजामध्ये जागृती निर्माण करून अन्याय, शोषण आणि गुलामगिरीविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.
त्यांनी उभारलेला ऐतिहासिक ‘उलगुलान’ हा केवळ संघर्ष नव्हता, तर आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि अधिकारांचा हुंकार होता. त्यांचे विचार आजही नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत.
परसलगोंदी येथे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून आदिवासी संस्कृती, सामाजिक एकोपा आणि महापुरुषांच्या विचारांप्रती असलेली आदरभावना दिसून आली. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि उत्स्फूर्त सहभागामुळे भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
जय बिरसा! जय जोहार! जल-जंगल-जमीन!
