कसनसूर येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी!
पारंपरिक ईलाका महाग्रामसभा वेन्हारा ईलाकाचा पुढाकार; जल, जंगल, जमीन आणि आदिवासी हक्कांच्या संघर्षाचा जागर
गडचिरोली | एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली : महामानव, क्रांतिकारी धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पारंपरिक ईलाका महाग्रामसभा वेन्हारा ईलाका यांच्या वतीने रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी मौजा कसनसूर येथील गोटूल भूमी वेनासर चौक येथे जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ईलाख्यातील विविध गावांमधील पारंपरिक पदाधिकारी, गावपाटील, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, महिला-पुरुष तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला ईलाका अध्यक्ष कोतुराम पोटावी, ईलाका सचिव तथा मानेवारा उपसरपंच देविदास मट्टामी, उपाध्यक्ष चंदू मट्टामी, दशरथ पोटावी, वाघेझरीच्या सरपंच तथा कोषाध्यक्ष विलास कोंदामी, माजी अध्यक्ष सुधाकर गोटा, पारपनगुडाचे नानसू नरोटे, जवेली बु.चे उपसरपंच दामजी हिचामी, मैनू लेकामी, गडदापल्लीचे राकेश मट्टामी, पुन्नूरचे विकास झोरे, सल्लागार प्रकाश पुंगाटी, कसनसूरच्या सरपंच तथा महिला अध्यक्ष कमल हेडो, महिला सचिव छाया कोवासे, एटापल्लीच्या माजी सभापती ललिता मट्टामी, कोटमीच्या सरपंच सिंधू मोहंदा आणि जिल्हा महाग्रामसभा अध्यक्ष नितीन दादा पदा यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय वेनासरचे भूमिया बाजू गावडे, विलास कोल्हा, सुरेश कोल्हा, रमेश पोटावी, वसंत झोरे, रोहिदास झोरे, मनोज तिम्मा, घोटसूरचे पाटील नरेश नरोटे, दुलसा गावडे पाटील, गडदापल्लीचे दलसू वड्डे, गंगाराम इष्टाम पाटील, मुरा पोटावी पाटील, देवू उसेंडी पाटील, गुंडामचे जानू मट्टामी व अनिल सिडाम, मंगेश हिचामी पाटील, कोंदावाहीचे शिक्षक सावजी हेडो, वाघेझरीचे शिक्षक गणू झोरे, कसनसूरचे पोलीस उपनिरीक्षक डामोरे साहेब, गोंगलू गोटा, शेंडिया कचलेर, कारका बु.चे नानसू नरोटे, बेबी हेडो, जया पुडो, छाया हिचामी, संगीता हिचामी, मनको पोटावी, भूमकानच्या अंगणवाडी सेविका, चोखेवाडाचे सरपंच लालसू नरोटे, आलापल्लीचे सामाजिक कार्यकर्ते मोकासे सर, मनोहर कोवासे, सुरज हिचामी आणि गट्टेपल्लीचे मधुकर पुडो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडांच्या संघर्षमय जीवनचरित्रावर मार्गदर्शन
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शकांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या संघर्ष, त्याग, बलिदान आणि क्रांतिकारी विचारांची माहिती उपस्थितांना दिली. अवघ्या २५ वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघर्ष उभारून आदिवासी समाजाच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी ऐतिहासिक लढा दिला. त्यांच्या नेतृत्वातून आदिवासी समाजामध्ये स्वाभिमान, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि आपल्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण झाली, असे मार्गदर्शकांनी सांगितले.
भगवान बिरसा मुंडा यांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये जिवंत राहिले पाहिजेत. आदिवासी समाजाने आपली पारंपरिक संस्कृती, रूढी-परंपरा, सामाजिक व्यवस्था आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी एकजुटीने पुढे आले पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पारंपरिक नेतृत्व आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
पारंपरिक ईलाका महाग्रामसभा वेन्हारा ईलाकाच्या वतीने आयोजित या जयंती सोहळ्याला विविध गावांतील महिला-पुरुष, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या माध्यमातून आदिवासी समाजातील एकजूट, पारंपरिक नेतृत्व आणि महाग्रामसभेच्या सामूहिक सहभागाचे दर्शन घडले.
धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करत हा कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
जल, जंगल, जमीन – आमचा हक्क, आमचा अभिमान!
धरती आबा क्रांतिसूर्य शहीद भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन!
