माणुसकीचा हात देण्यासाठी सतीश भाऊ बोगे यांचे एक पाऊल पुढे!
मद्दिकुंठा येथील गरीब कुटुंबाला दुःखाच्या प्रसंगी आर्थिक आधार; श्रीनिवास पुलुरी यांच्या अंत्यसंस्कारासाठी केली तातडीने मदत
सपांद
माणुसकी ही केवळ बोलण्यातून नव्हे, तर संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहण्यातून सिद्ध होते! याच सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय मद्दिकुंठा येथे आला. गावातील गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा नगरसेवक सतीश भाऊ बोगे यांनी मदतीचा हात पुढे करीत माणुसकीचे दर्शन घडवले.
मद्दिकुंठा येथील श्रीनिवास पोचम पुलुरी (वय ३५) यांचे आजारपणामुळे निधन झाले. श्रीनिवास हे गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. मात्र, घरची अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि गरिबी यामुळे त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर त्यांची जीवनाशी सुरू असलेली झुंज संपली आणि कुटुंबाचा आधार हरपला.
आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या या कुटुंबासमोर आता अंत्यसंस्काराचाही प्रश्न उभा राहिला. अशा कठीण प्रसंगी गावकऱ्यांनी श्रीनिवास यांच्या निधनाची माहिती सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक सतीश भाऊ बोगे यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी कोणताही विलंब न करता पुढाकार घेतला आणि शोकाकुल कुटुंबाला अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत केली.
दुःखाच्या वेळी धावून येणारा माणूसच खऱ्या अर्थाने माणुसकी जपतो!
आज समाजात अनेकजण मोठमोठ्या गोष्टी बोलतात; मात्र एखाद्या गरीब कुटुंबावर संकट कोसळले असताना प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणारे हात महत्त्वाचे असतात. सतीश भाऊ बोगे यांनी दाखवलेली तत्परता ही केवळ आर्थिक मदत नसून संकटात सापडलेल्या कुटुंबाला दिलेला माणुसकीचा आधार आहे.
समाजातील शेवटच्या घटकातील गरजू माणसाच्या दुःखात सहभागी होणे, त्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे, हेच खरे सामाजिक कर्तव्य आहे. सतीश भाऊ बोगे यांच्या या मदतीचे मद्दिकुंठा परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पद, प्रतिष्ठा आणि राजकारणापेक्षा माणुसकी मोठी असते, याची जाणीव करून देणारा हा प्रसंग समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.
