नेनवाडी महा ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय; मायनिंगला ठाम विरोध, विदेशी दारूबंदी कायम, डीजेवर एक लाख दंड!एटापल्ली,
प्रतिनिधी : गिरीश नरोटे
एटापल्ली तालुक्यातील मौजा नेनवाडी येथे शनिवार, दि. २० जून रोजी पारंपरिक इलाका महा ग्रामसभेचे भव्य आयोजन करण्यात आले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी गाव पाटील बाजीराव मट्टामी होते. यावेळी उपाध्यक्ष बंडूभाऊ दोरपेटी, सुरजागड इलाका महा ग्रामसभा सदस्य लक्ष्मण दादा जेट्टी, सचिव देवू हिचामी तसेच विविध गावांचे ग्रामसभा अध्यक्ष, सचिव, पाटील, सरपंच आणि शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, पर्यावरण आणि आदिवासी स्वायत्ततेशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सुरजागड इलाक्याची पारंपरिक व्यवस्था, ग्रामसभा अधिकार आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
डीजेवर बंदी; नियम मोडल्यास एक लाख रुपयांचा दंड
ग्रामसभेत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विवाह समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये डीजे वापरण्यास बंदी घालण्याचा घेण्यात आला. पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तब्बल एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
विदेशी दारूबंदी कायम; पारंपरिक मोहा दारूस सूट
सुरजागड इलाक्यात विदेशी दारू विक्री व वापरावर पूर्वीप्रमाणेच बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या मोहा फुलापासून तयार होणाऱ्या पारंपरिक पेयाला या बंदीतून वगळण्यात आले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी ट्रॅक्टर नांगरणी दर निश्चित
डिझेल व पेट्रोलच्या वाढत्या किमतींचा विचार करून ट्रॅक्टरद्वारे शेती नांगरणीचा दर प्रति तास ९५० रुपये निश्चित करण्यात आला. यामुळे शेतकरी व ट्रॅक्टर मालक यांच्यातील व्यवहारात पारदर्शकता राहण्यास मदत होणार असल्याचे ग्रामसभेत सांगण्यात आले.
पेसा कायद्याचे उल्लंघन करून सुरू असलेल्या मायनिंगवर तीव्र संताप
ग्रामसभेत सर्वाधिक चर्चा आणि चिंता व्यक्त करण्यात आलेला विषय म्हणजे परिसरातील वाढत्या खाणकामाच्या हालचाली. उपस्थितांनी आरोप केला की, अनुसूचित क्षेत्रात लागू असलेल्या पेसा कायदा, पाचवी अनुसूची आणि सातवी अनुसूचीतील तरतुदींचे उल्लंघन करून जबरदस्तीने मायनिंग प्रकल्प पुढे रेटले जात आहेत.
वेडमागड, वाटेली, मोडसके, पुस्के तसेच बोर्डमेट्टा, मुंहांदी, आलुर आणि दामकोंडवाही परिसरात विविध प्रकारचे सर्वेक्षण, रस्ते निर्मिती आणि खाणकामासंदर्भातील हालचाली सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी गंभीर चिंता व्यक्त केली. खाणकामामुळे जंगल, जलस्रोत, शेती, जैवविविधता आणि स्थानिक आदिवासींच्या जीवनावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामसभेची ठाम भूमिका; परवानगीपूर्वी ग्रामसभेची संमती बंधनकारक
महा ग्रामसभेने स्पष्ट शब्दांत ठराव मंजूर करत सांगितले की, गावातील पोलीस पाटील, सरपंच किंवा कोणताही पदाधिकारी ग्रामसभा अध्यक्ष, सचिव आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता मायनिंगसाठी कोणतीही एनओसी अथवा परवानगी देऊ शकणार नाही. ग्रामसभेच्या संमतीशिवाय घेतलेले कोणतेही निर्णय मान्य केले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली.
आदिवासी हक्क आणि ग्रामस्वायत्ततेचा बुलंद आवाज
महा ग्रामसभेत उपस्थित सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या निर्णयांचा सन्मान राखून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. विविध गावांतील प्रतिनिधींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही महा ग्रामसभा अत्यंत यशस्वी ठरली.
सुरजागड इलाक्यातील आदिवासी समाजाने आपल्या जल, जंगल, जमीन आणि पारंपरिक अधिकारांच्या संरक्षणासाठी पुन्हा एकदा एकजुटीचा निर्धार व्यक्त करत मायनिंगविरोधी ठाम भूमिका जाहीर केली.
