नरसिंहपल्ली ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या मुलदिम्मा-पापायपल्ली गावातील रस्ता अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत; ग्रामस्थ त्रस्त
सपांदक
तालुक्यातील नरसिंहपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुलदिम्मा-पापायपल्ली गावाकडे जाणारा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता कडकमय व धोकादायक बनला आहे.
पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असल्याने वाहनचालक, शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक तसेच रोजंदारीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त होत असल्याच्या घटना घडत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेकदा ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाकडे निवेदने व तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा व इतर आवश्यक वाहने वेळेवर गावात पोहोचू शकत नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.
या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे गावाच्या विकासालाही मोठा फटका बसत असून शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीसाठी अतिरिक्त वेळ व खर्च करावा लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन मुलदिम्मा-पापायपल्ली रस्त्याचे पुनर्निर्माण व डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
— प्रतिनिधी
त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
