0-6496x2880-0-0-{}-0-12#
“माझ्या लेकराला वाचवा हो…!”; तीन शस्त्रक्रिया फेल, तरी आरोग्य यंत्रणेची दखल नाही; आईच्या आक्रोशाने हेलावला सिरोंचा”
गरीबीसमोर हतबल माय-बाप; चिमुकल्याच्या जीवासाठी शासनाच्या दारात आर्त याचना…!
सिरोंचा प्रतिनिधी : सपांदक
आईच्या कुशीत असलेले लेकरू हे तिचे सर्वस्व असते. त्या लेकराच्या वेदना पाहून आईचे काळीज तुटते. अशीच हृदयद्रावक घटना सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली गावात समोर आली असून, एका गरीब दलित दाम्पत्याची आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहून प्रत्येकाचे मन हेलावून जात आहे.
तीन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या जनगाम दाम्पत्याच्या संसारात बाळाच्या जन्माने आनंदाचे क्षण आले होते. मात्र, जन्मानंतर काही दिवसांनी बाळाचे डोके असामान्यपणे मोठे होऊ लागले. लेकराची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे पाहून आई-वडिलांच्या काळजाचा थरकाप उडाला.
हैदराबाद येथील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी बाळाच्या डोक्यात पाणी साचल्याचे सांगितले. त्यानंतर बाळावर एकामागून एक तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, दुर्दैवाने तिन्ही शस्त्रक्रिया अपेक्षित यश देऊ शकल्या नाहीत. लेकराच्या उपचारासाठी आई-वडिलांनी घरातील सर्व जमा-पूंजी खर्च केली. आज त्यांच्याकडे उपचारासाठी एक रुपयाही उरलेला नाही.
विशेष म्हणजे, एवढी गंभीर परिस्थिती असतानाही आरोग्य विभाग, आशा सेविका, नर्स किंवा संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी आजपर्यंत या कुटुंबाची कोणतीही दखल घेतलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ या कुटुंबापर्यंत पोहोचला नसल्याची खंतही व्यक्त केली जात आहे.
आज हे गरीब दाम्पत्य आपल्या आजारी लेकराला कुशीत घेऊन शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत, तर ओठांवर एकच विनवणी —
“साहेब… आमच्या बाळाला वाचवा हो…! तीन वर्षांपासून आम्ही दवाखान्याचे उंबरठे झिजवत आहोत. आमच्याकडे आता काहीच उरले नाही. शासनाने मदत केली तरच आमच्या लेकराला नवे जीवन मिळू शकेल…”
या कुटुंबाची व्यथा ऐकून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. एका निष्पाप चिमुकल्याच्या जीवासाठी सुरू असलेली ही लढाई आता शासन आणि आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
आरोग्य विभाग जागा होणार का…?
या चिमुकल्याला उपचारासाठी मदत मिळणार का…?
गरीब माय-बापाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी शासन पुढे येणार का…?
या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची प्रतीक्षा आज संपूर्ण परिसराला लागली आहे. एका निष्पाप जीवाचे भविष्य आणि एका आईच्या मायेची हाक आता प्रशासनापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज बनली आहे. 💔😢
