सिरोंचा तालुक्यात कथित बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; ग्रामीणांच्या जीवाशी सुरू आहे खेळ? प्रशासन मात्र गाढ झोपेत?
१२४ गावांमध्ये कथित अवैध वैद्यकीय व्यवसाय; कारवाईपूर्वीच माहिती फुटते तरी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा गोरखधंदा?
सिरोंचा:- सपांदक
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात कथित बोगस डॉक्टरांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याची गंभीर चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनेक छोट्या गावांमध्ये वैध वैद्यकीय पदवी किंवा नोंदणी नसल्याचा संशय असलेले काही जण स्वतःला डॉक्टर म्हणवत रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे निरपराध ग्रामीणांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेजारच्या तेलंगणा राज्यातील काही जण तेथील एमडी, एमबीबीएस डॉक्टरांकडे काही वर्षे सहाय्यक म्हणून काम करून उपचाराचे थोडेफार ज्ञान घेऊन सिरोंचा तालुक्यात येऊन स्वतःचे दवाखाने चालवत आहेत. काही जण स्वतःला आरएमपी असल्याचे सांगून इंजेक्शन, सलाईन आणि विविध आजारांवर उपचार करत असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्याकडे वैध वैद्यकीय पात्रता व नोंदणी आहे की नाही, याची खातरजमा करणे हे संबंधित प्रशासनाचे काम आहे.
स्थानिक माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यातील १२४ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा कथित डॉक्टरांचा वावर आहे. तर तालुका मुख्यालयापासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावरील रेगुंठा गावातच जवळपास १० जण वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, औषधे व आवश्यक सुविधा अपुऱ्या असल्याने अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे गरीब व आदिवासी नागरिक नाईलाजाने अशा कथित डॉक्टरांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, प्रशासनाने यापूर्वी अनेकदा कारवाईचे प्रयत्न केले. मात्र प्रत्येक वेळी कारवाईपूर्वीच संबंधित दवाखाने बंद होतात आणि संबंधित व्यक्ती गायब होतात. कारवाईची माहिती आधीच कोण देतो? प्रशासनातीलच कुणाचा हात आहे का? असे गंभीर प्रश्न आता जनतेतून उपस्थित केले जात आहेत.
ग्रामीण नागरिकांची मागणी आहे की, संपूर्ण तालुक्यात विशेष मोहीम राबवून प्रत्येक खासगी दवाखान्याची चौकशी करण्यात यावी. वैध वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर, औषधे व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी.
“गरीबांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; अन्यथा एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का?”
(टीप : या वृत्तातील माहिती स्थानिकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आहे. संबंधित व्यक्तींची वैद्यकीय पात्रता किंवा बेकायदेशीर व्यवसायाबाबतचा अंतिम निष्कर्ष सक्षम शासकीय चौकशीनंतरच निश्चित होईल.)
