एटापल्ली प्रतिनिधि :- गिरीश नरोटे
वटेगट्टा गावात पाणीटाकीची दुरवस्था; गटारी तुंबल्या, ग्रामस्थांचा संताप
महिन्यांपासून गळती व तोडफोड झालेली पाणीटाकी दुरुस्त नाही; चार-पाच वर्षांपासून नाल्यांची स्वच्छता न झाल्याने दुर्गंधीचे साम्राज्य
,
हालेवारा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा वटेगट्टा येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, मागील काही महिन्यांपासून टाकीला गळती लागलेली आहे तसेच काही ठिकाणी तिची तोडफोड झाल्याचे दिसून येत आहे. मात्र इतका कालावधी उलटूनही संबंधित प्रशासनाने दुरुस्तीकडे कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याचबरोबर गावातील नाल्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून नाल्यांमधील गाळ, कचरा आणि साचलेला चिखल काढण्यात आलेला नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्यांबाबत ग्रामसेवक श्री. कोठारे यांना अनेक वेळा तोंडी सूचना व मागण्या करण्यात आल्या. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पाणीटाकीची दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच नाल्यांमधील गाळ व कचरा त्वरित काढून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष न दिल्यास ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
“विकासाच्या घोषणा कागदावरच; वटेगट्टा ग्रामस्थांना मात्र मूलभूत सुविधांसाठी अजूनही प्रतीक्षा!”
