एनएच-६३ वर मृत्यूचा सापळा; प्रशासन झोपेत, नागरिक धोक्यात!
सहा दिवसांपासून रस्त्यावर पडलेली झाडे कायम; कारवाई न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला ठोकणार टाळे
“अपघात झाल्यास संबंधित अधिकारीच जबाबदार!” – सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पुलगम यांचा घणाघाती इशारा
आसरल्ली प्रतिनिधि :–
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ (निजामाबाद–जगदलपूर मार्ग) वरील पेंटीपाका परिसरात दि. १८ जून रोजी झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक मोठी झाडे रस्त्यावर कोसळली. मात्र सहा दिवस उलटूनही संबंधित विभागाने ही झाडे हटविण्याची कोणतीही कार्यवाही केली नसल्याने हा महामार्ग अक्षरशः “मृत्यूचा सापळा” बनला आहे. वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेल्या या निष्काळजी खेळामुळे संतापाची लाट उसळली आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पुलगम यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत, तातडीने कारवाई न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पुलगम म्हणाले, “राष्ट्रीय महामार्गावर सहा दिवस झाडे पडून राहणे ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाची नव्हे तर बेजबाबदारपणाची पराकाष्ठा आहे. अधिकारी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, या मार्गावर एखादा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी, अभियंते आणि प्रशासनाची राहील.
यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमध्ये टक्केवारीच्या चर्चेत व्यस्त राहणारे अधिकारी नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित मूलभूत प्रश्नांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यासारखे साधे कामही होत नसेल तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्येही तीव्र संतापाचे वातावरण असून अनेक दिवसांपासून वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे.
चंद्रशेखर पुलगम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार देऊन रस्त्यावर पडलेली झाडे तात्काळ हटविणे, वाहतूक सुरळीत करणे आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“आता तरी जागे व्हा… अन्यथा टाळे ठोक आंदोलन अटळ!”
पुढील काही दिवसांतही प्रश्न निकाली न काढल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा पुलगम यांनी दिला आहे.
आता प्रशासन तातडीने कार्यवाही करून नागरिकांचे प्राण वाचवणार, की एखाद्या भीषण दुर्घटनेनंतरच जागे होणार? हा प्रश्न संपूर्ण सिरोंचा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
