घराघरात नळ’ योजना ठप्प! वेलगुर (वॉर्ड क्र. २) मध्ये दोन वर्षांपासून पाण्याचा थेंबही नाही; ग्रामस्थांचा संताप
उपमथळा
-
एटापल्ली:- तिनिधि गिरीश नरोटे
वारंवार तक्रारी करूनही ग्रामसेवकांकडून दुर्लक्ष; तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
दामरंचा (वेलगुर) प्रतिनिधी | दि. १६/०७/२०२६ (गुरुवार)
ग्रामपंचायत दामरंचा अंतर्गत येणाऱ्या मौजा वेलगुर, वॉर्ड क्रमांक २ येथे जलजीवन मिशन अंतर्गत ‘घराघरात नळ’ योजनेतून प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी करण्यात आली. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या नळातून पाण्याचा एक थेंबही आलेला नाही, अशी गंभीर तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत ग्रामसेवक श्री. आशिष मांगर यांना अनेक वेळा तोंडी माहिती देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाची महत्त्वाकांक्षी योजना केवळ कागदोपत्री आणि नावालाच असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, लोकांना प्रत्यक्ष लाभच मिळत नसेल तर अशा योजनांवर खर्च केलेला निधी व्यर्थ ठरत आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली योजना दोन वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नळ पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात या प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
