‘हर घर जल’ योजनेचा बोजवारा; चंद्रा गावात नळातून पाण्याची उधळपट्टी, अर्धवट नाली कामामुळे नागरिक संतप्त!
ग्रामसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष; तातडीने दुरुस्ती व नालीचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी
सिरोंचा | प्रतिनिधी | गिरीश नरोटे
दि. १५ जुलै २०२६
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत पेरमिली अंतर्गत येणाऱ्या मौजा चंद्रा येथे शासनाच्या नळ पाणीपुरवठा योजनेची दयनीय अवस्था समोर आली आहे. गावातील अनेक घरांमध्ये नळजोडणी करण्यात आली असली तरी अनेक नळ तुटलेल्या अवस्थेत असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे शासनाच्या पाणी बचतीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर समस्येबाबत ग्रामसेवक श्री. सिद्धांत बडगु यांना अनेक वेळा तोंडी कळविण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
याशिवाय गावातील नाली बांधकामही अर्धवट अवस्थेत असून उर्वरित काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. नालीचे मोजमाप (मेजरमेंट) देखील पूर्ण झाले; मात्र अनेक महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत तुटलेल्या नळांची त्वरित दुरुस्ती करून पाण्याची होणारी नासाडी थांबवावी तसेच अपूर्ण नाली बांधकाम तात्काळ पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.
