२२ जुलैला गडचिरोली जिल्ह्यात भव्य वृक्षारोपण अभियान; सर्वांनी सहभागी व्हावे – आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम
प्रतिनिधी :तिरुपति मडावी
येत्या २२ जुलै रोजी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्हाभर भव्य वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जिल्हा हिरवागार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.
यावेळी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन आमदार डॉ. बाबा आत्राम यांनी केले.
ते म्हणाले, “वृक्ष लागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संकल्प आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि गडचिरोली जिल्हा अधिक हिरवागार करण्यासाठी सर्व नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.”
या निमित्ताने जिल्हाभर विविध ठिकाणी वृक्षारोपण, जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
