२२ गावांचा जीवनदुवा ठप्प! अहेरी–येचली–बामणपल्ली बस सेवा तात्काळ सुरू करा; आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन
तीन-चार महिन्यांपासून एसटी सेवा बंद; विद्यार्थी, शेतकरी, महिला व रुग्णांचे हाल – प्रवासी तिकीट न काढल्याने चुकीचा अहवाल तयार झाल्याचा आरोप
प्रतिनिधी : तिरपती मडावी
अहेरी–येचली–बामणपल्ली ही एसटी बस सेवा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद असल्यामुळे मन्नेराजाराम परिसरातील तब्बल २२ गावांतील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना रोजच्या प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) भामरागड तालुकाध्यक्ष इंदरशाह रामशाह मडावी यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत बस सेवा बंद करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रवाशांची नियमित तिकिटेच काढली जात नसल्याने प्रवासी संख्येचा चुकीचा अहवाल तयार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बस सेवा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत मन्नेराजाराम आणि ग्रामपंचायत येचली यांच्या ठरावांच्या प्रतीही आमदारांना सादर करण्यात आल्या. बस सेवा पुन्हा सुरू झाल्यास परिसरातील २२ गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) भामरागड तालुकाध्यक्ष इंदरशाह मडावी, मांतय्या आत्राम तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
