प्रतिनिधि :- गिरीश नरोटे बांबूच्या भरवशावर वीजपुरवठा; नागुलवाडीत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात!
दोन-तीन वर्षांपासून तुटलेले विद्युत खांब तसेच; 220 केव्हीच्या धोकादायक तारा बांबूला लटकलेल्या अवस्थेत, नळयोजनाही मोडकळीस – ग्रामस्थांचा संताप
दि. 17 जुलै 2026
एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत नागुलवाडी (हेटलकसा) येथे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गावातील विद्युत खांब तुटलेल्या अवस्थेत असून, अखंड वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बांबूच्या साहाय्याने विद्युत तारा लटकवून वीजपुरवठा सुरू ठेवला आहे.
विशेष म्हणजे, इतकी गंभीर परिस्थिती असतानाही महावितरण कंपनी दर महिन्याला वीजबिल मात्र नियमित पाठवत आहे, पण तुटलेले खांब बदलण्याची किंवा धोकादायक तारा सुरक्षित करण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने 220 केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या बांबूच्या आधारावर असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. वादळी वारे किंवा मुसळधार पावसामुळे हे बांबू कोसळल्यास विद्युत तारा जमिनीवर पडून नागरिक, लहान मुले किंवा जनावरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या धोकादायक परिस्थितीबाबत एमएसईबी (महावितरण) एटापल्ली कार्यालयाला अनेक वेळा लेखी व तोंडी माहिती देण्यात आली, मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याच गावातील ‘हर घर नळ’ पाणीपुरवठा योजनेचीही अवस्था बिकट आहे. पाण्याच्या टाकीवरील झाकण गायब असून, अनेक ठिकाणी पाईपलाईन तुटलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, या समस्येबाबत नागुलवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. मडावी यांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ग्रामस्थांचा इशारा
“प्रशासनाने तातडीने तुटलेले विद्युत खांब बदलून वीजवाहिन्या सुरक्षित कराव्यात, तसेच नळयोजनेची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा ग्रामस्थांना तीव्र लोकआंदोलन छेडावे लागेल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
संपादकीय प्रश्न
अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? की एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यानंतरच तुटलेले खांब बदलले जाणार? नागुलवाडीतील नागरिकांच्या जीवाची जबाबदारी नेमकी कोण घेणार?
