आरोग्य सेवेच्या बळकटीकडे अहेरीची दमदार वाटचाल!
५८ लाखांच्या नव्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण
अहेरी | प्रतिनिधी
अहेरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या ५८ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेली ही आधुनिक प्रशासकीय इमारत आरोग्य विभागाच्या कामकाजासाठी महत्त्वाची ठरणार आहे. नव्या कार्यालयामुळे आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय समन्वय, नागरिकांना जलद सेवा आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा पोहोचविणे हे शासनाचे प्राधान्य आहे. आरोग्य विभागाला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत.”
या लोकार्पणामुळे अहेरी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला नवे बळ मिळणार असून, नागरिकांना अधिक प्रभावी व दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
