पावसाने दिलासा, पण अपूर्ण महामार्गामुळे वाढली चिंता!
सिरोंचा–आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे जिल्हाल्याशी सपर्क तुटणार
प्रतिनिधी | सिरोंचा | १८ जुलै
सिरोंचा तालुक्यातील शेतकरी गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत चिंतेत दिवस काढत होते. पेरणी करूनही पाऊस न आल्याने बियाणे, खत, नांगरणी आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करूनही पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. अनेक शेतकरी “यंदा पाऊस नाही आला तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार?” या विवंचनेत होते.
मागील महिनाभरात एखाद्या वेळी केवळ रिमझिम पाऊस झाला, मात्र शेतीसाठी तो अपुरा ठरला. अखेर १७ जुलैपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि १८ जुलै रोजी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईल इतका पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. आता पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
मात्र, या आनंदावर सिरोंचा–आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामाने पाणी फेरले आहे. रस्त्यावरील चिखल, मोठमोठे खड्डे आणि अपूर्ण बांधकामामुळे चारचाकी वाहने चिखलात अडकत आहेत. प्रवास अत्यंत धोकादायक आणि संथ झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सतत पाऊस सुरू राहिल्यास तालुक्यातील अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे. लहान नाले आणि ओढे भरून वाहू लागल्यास नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. आपत्कालीन सेवांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अपूर्ण महामार्ग आणि दळणवळणाच्या समस्येमुळे संपूर्ण तालुका चिंतेच्या छायेत आहे. त्यामुळे “आनंद साजरा करावा की पुढील संकटाची चिंता करावी?” असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.
प्रशासनाने सिरोंचा–आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी करत आहेत.
