वाहत्या पाण्याशी जीवन, गंगामातेवर श्रद्धा; भोई समाजाची अनोखी परंपरा जपणारा भक्तिमय सोहळा
सिरोंचा | प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पहिल्या सरी बरसल्या की गंगापुत्र भोई (मच्छीमार) समाजाच्या जीवनात भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा पवित्र उत्सव सुरू होतो. गंगामाता पूजा हा केवळ धार्मिक विधी नसून, नदीशी जोडलेल्या समाजाच्या जीवनसंस्कृतीचा, निसर्गावरील विश्वासाचा आणि कष्टमय जीवनाचा जिवंत दस्तऐवज आहे.
भोई समाजातील पुरुष आणि महिला वर्षभर वाहत्या नदीत जीव धोक्यात घालून मासेमारी करतात. अनेकदा मध्यरात्री छोट्याशा लाकडी नावेत बसून प्राणहिता नदीच्या खोल पाण्यात जाळी टाकली जाते. मुसळधार पाऊस, वेगवान प्रवाह, अंधार आणि वन्यजीवांचा धोका असूनही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे मच्छीमार रात्रभर नदीतच राहतात. पहाटे जाळ्यात अडकलेले मासे घेऊन बाजारात विक्रीसाठी येतात आणि त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा संसार चालतो.
याच कष्टमय जीवनात त्यांचा सर्वात मोठा आधार म्हणजे गंगामाता. “हे गंगामाते, तुझ्या कृपेने आमच्या कुटुंबातील कोणाच्याही जीवाला धोका होऊ देऊ नको, आमच्या संसाराचे रक्षण कर,” अशी मनोभावे प्रार्थना करून समाजबांधव गंगामातेची पूजा करतात. नदी ही त्यांच्यासाठी केवळ पाण्याचा स्रोत नसून जीवनदायिनी माता आहे.
या दिवशी भोई समाजातील माता-भगिनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर नैवेद्य घेऊन ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गंगामाता मंदिर ते प्राणहिता नदी घाट अशी भव्य शोभायात्रा काढतात. बालक, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि मच्छीमार बांधव मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होतात. गंगामातेचा जयघोष करत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जातो.
समाजातील ज्येष्ठ ‘बोईडू’, प्रत्येक वॉर्डातील समाजप्रमुख आणि समाजबांधव अनेक पिढ्यांपासून ही परंपरा शिस्त, निष्ठा आणि श्रद्धेने जपत आहेत. गंगामातेला नैवेद्य अर्पण करून चांगला पाऊस, भरघोस मासेमारी, समाजाचे सुख-समृद्धी आणि सर्वांच्या सुरक्षिततेची प्रार्थना केली जाते.
गंगामाता पूजा ही भोई समाजासाठी केवळ श्रद्धेचा उत्सव नसून, नदीशी असलेल्या अतूट नात्याचा, कष्टाचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचा पवित्र सोहळा आहे.
॥ गंगामाता की जय ॥ 🙏
