तालुक्यापासून अवघ्या ५ किमीवरील दोडडी गावाचा रस्ता दयनीय; नळ पाणीपुरवठा योजनाही ठरली अपयशी
एटापल्ली | प्रतिनिधी गिरीश नरोटे
एटापल्ली तालुक्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा दोडडी गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, ग्रामस्थांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तालुक्याच्या इतक्या जवळ असलेल्या गावाची ही अवस्था असेल, तर दुर्गम भागातील रस्त्यांची परिस्थिती किती गंभीर असेल, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे चिखलमय होत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहने अडकून पडतात. विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एखादा रुग्ण गंभीर आजारी पडल्यास त्याला वेळेत रुग्णालयात पोहोचविणेही कठीण बनत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यासोबतच गावात राबविण्यात आलेली ‘हर घर नळ’ पाणीपुरवठा योजना देखील अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लाखो रुपये खर्च करूनही अनेक घरांमध्ये नियमित पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना आजही विहीर, बोअरवेल आणि इतर पर्यायी स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे या योजनेच्या दर्जाबाबत आणि अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्ता व नळ योजनेबाबत अनेक वेळा संबंधित विभाग आणि ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
दोडडी ग्रामस्थांनी रस्ता तातडीने दुरुस्त करावा, नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी आणि संबंधित कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शासन व प्रशासनाकडे केली आहे.
टीप: वरील बातमीतील आरोप आणि दावे हे ग्रामस्थांनी केलेले आहेत. संबंधित ग्रामपंचायत किंवा प्रशासनाची भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
