एटापल्ली तालुक्यातील ५ गावांना जोडणारा १९ किमी रस्ता ४-५ वर्षांतच उखडला
निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. १३ ऑगस्ट २०२६
एटापल्ली : राजोली–जमगाव–जडेगाव–पैडी–कोटमी या पाच गावांना जोडणारा सुमारे १९ किलोमीटर लांबीचा ग्रामीण रस्ता बांधकामानंतर अवघ्या चार-पाच वर्षांतच खराब झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सन २०२०-२१ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आलेला हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी गडचिरोलीकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे.
रस्ता बांधल्यानंतर पहिल्याच वर्षापासून डांबरीकरण उखडण्यास सुरुवात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सध्या संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबर निघून गिट्टी उघडी पडली आहे.
पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून खड्डे, चिखल आणि पाण्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच शेतीमालाची वाहतूक करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. या मार्गावर सुमारे पाच हजार नागरिक अवलंबून असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कसनसूरमार्गे गडचिरोलीकडे जाण्यासाठी हा मार्ग तुलनेने सोयीचा असल्याने नागरिक, कर्मचारी आणि इतर वाहनचालक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था ही केवळ वाहतुकीची समस्या नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत आहे.
कोट्यवधींच्या निधीच्या कामावर प्रश्नचिन्ह
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणातील निधी वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित कामाची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
रस्त्याची तातडीने पाहणी करून संपूर्ण मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे.
निकृष्ट कामासाठी जबाबदार ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
कायमस्वरूपी दुरुस्ती होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत.
या मागण्यांसाठी पाचही गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
