जाफराबाद ग्रामपंचायत वादाला नवे वळण; सदस्य महेंदर दुर्गम पोलिसांच्या दारात
आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले; पैशांची मागणी, धमकी व बदनामीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायतीतील कथित निधी गैरवापराच्या आरोपांवरून सुरू असलेल्या वादाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच ग्रामपंचायत सदस्य महेंदर दुर्गम यांनी थेट बामणी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा आता ग्रामपंचायतीच्या चौकटीबाहेर जाऊन पोलिस तपासाच्या पातळीवर पोहोचली आहे.
ग्रामपंचायतीच्या निधीचा दुरुपयोग करून पैसे खर्च केल्याचा आरोप खोटा असल्याची भूमिका सरपंच स्वामी गोदारी यांनी यापूर्वी माध्यमांसमोर मांडली होती. तसेच आनंदराव आशा यांनी विविध ठिकाणी तक्रारी करून आपल्यावर आरोप करत पैशांची मागणी आणि धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
यानंतर आनंदराव आशा यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना, आपण केलेल्या तक्रारींच्या मागे ग्रामपंचायत सदस्य महेंदर दुर्गम असल्याचा आरोप केला. या आरोपामुळे प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप आले आणि जाफराबादसह सिरोंचा तालुक्यात चर्चेला उधाण आले.
‘माझे नाव गोवण्याचा प्रयत्न’ — दुर्गम यांची भूमिका
दरम्यान, महेंदर दुर्गम यांनी पोलिसांत तक्रार दाखल करून आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात आपले नाव जाणीवपूर्वक गोवले जात असून, आरोपांमागील सत्य तपासातून समोर यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पैशांची मागणी, धमकी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी भूमिका दुर्गम यांनी घेतली आहे.
आता पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष
जाफराबाद ग्रामपंचायतीतील निधीचा कथित गैरवापर, त्यानंतर झालेले आरोप-प्रत्यारोप आणि आता पोलिसांत दाखल झालेली तक्रार यामुळे प्रकरण अधिकच तापले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची सत्यता अद्याप तपासातून सिद्ध झालेली नसून, पोलिस चौकशीनंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
आता बामणी पोलिस या तक्रारीची कोणत्या दिशेने चौकशी करतात, आरोपांमागील तथ्य काय आहे आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे जाफराबाद ग्रामपंचायतीसह संपूर्ण सिरोंचा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
आरोपांच्या राजकारणाला आता पोलिस तपासाची जोड मिळाल्याने जाफराबाद ग्रामपंचायत प्रकरण पुढे कोणते वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
