झाडीपट्टी रंगभूमीचा बहुआयामी रंगसाधक : मुकेश गेडाम
बालकलाकारापासून ज्येष्ठ रंगकर्मीपर्यंतचा थक्क करणारा
कलाप्रवास; अभिनय, लेखन, दिग्दर्शन, गायन व वादनातून झाडीपट्टीच्या रंगभूमीला समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व
पूर्वविदर्भाच्या मातीत नाटक, लोककला आणि सांस्कृतिक परंपरेची समृद्ध परंपरा रुजलेली आहे. या परंपरेला अनेक रंगकर्मींनी आपल्या प्रतिभेने बहर दिला. याच झाडीपट्टीच्या रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि बहुआयामी कलागुणांनी स्वतंत्र ठसा उमटविणारे नाव म्हणजे मुकेश गेडाम.
अभिनेता, नाटककार, दिग्दर्शक, गायक, तबला वादक, प्रभावी वक्ता आणि सामाजिक प्रबोधनाची धुरा वाहणारा संवेदनशील कलासाधक अशी त्यांची ओळख आहे. रंगभूमीवरील कोणतीही भूमिका स्वीकारून तिच्यात पूर्णपणे झोकून देण्याची त्यांची वृत्ती ही त्यांच्या कलाप्रवासाची खरी ताकद आहे.
अवघ्या अकराव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल
मूल तालुक्यातील डोंगरगावचे रहिवासी असलेल्या मुकेश गेडाम यांना कलेचा वारसा घरातूनच मिळाला. आजोबा आणि वडिलांच्या कलाप्रेमामुळे बालपणापासूनच त्यांना रंगभूमीचे आकर्षण निर्माण झाले. सन १९८८ मध्ये वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी ‘सम्राटाचा सम्राट’ या नाटकातून बालकलाकार म्हणून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.
ते पहिले पाऊल पुढे एका प्रदीर्घ कलासाधनेत रूपांतरित झाले. हौशी रंगभूमीपासून व्यावसायिक झाडीपट्टी रंगभूमीपर्यंतचा त्यांचा प्रवास आज अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
खलनायक असो वा नायक… प्रत्येक भूमिकेला न्याय
‘गरीबाचा कैवारी’, ‘राखणदार’, ‘इष्काची इंगळी’, ‘धनुर्वेद’, ‘चक्रव्यूह’, ‘तेजस्वी कर्ण’, ‘फकिरा’, ‘ठिणगी’, ‘डाकू लाखन’, ‘शिकारी’ यांसह असंख्य नाटकांत त्यांनी विविध भूमिका साकारल्या.
‘माझा सौभाग्याचा धनी’मधील कामेश्वर गुज्जर आणि ‘नको जाळूस घरटं माझं’मधील पाशा पुजारी या भूमिकांनी त्यांच्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. पुढे ‘हेच माझे माहेर’ आणि ‘आयुष्याच्या वाटेवर’ या नाटकांच्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक झाडीपट्टी रंगभूमीवर आपली चुणूक दाखवून दिली.
‘भूक’मधील विवेक आनंद, ‘अहंकार’मधील पराग नारंग, ‘पुत्र भारतमातेचा’मधील अफरोज आतंकवादी, ‘कसोटी कुंकवाची’मधील सुलतान दलाल, ‘अरे माणसा माणसा’मधील विराज, ‘हंबरते गाय वासराची’मधील सूर्या, ‘आघात’मधील पागल, ‘बंदिवान मी या जन्माची’मधील बावा, ‘गहाण’मधील मारत्या, ‘डाग लागला तुझ्यामुळे’मधील प्रताप, ‘घायाळ’मधील प्रेमवेडा, ‘उद्रेक’मधील प्रलय, ‘जाणवर’मधील रुद्रा, ‘माऊली’मधील जग्गू, ‘अग्नितांडव’मधील मुन्ना तिवारी अशा अनेक व्यक्तिरेखा त्यांनी गाजवल्या.
विशेषतः त्यांच्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या ठरल्या. आतंकवादी, दलाल, विकृत पात्र, स्त्रीवेषातील महाराणी, भडवा, बेवडा, पागल, प्रेमवेडा अशा परस्परविरोधी भूमिका साकारताना त्यांनी अभिनयातील वैविध्य सिद्ध केले.
शब्दांवर अचूक भर, तुटक आणि आघाती संवादफेक, डोळ्यांची प्रभावी हालचाल आणि व्यक्तिमत्त्वाला साजेसा भारदस्त आवाज ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये मानली जातात.
मुंबईतही झाडीपट्टीचा डंका
झाडीपट्टी रंगभूमीचा लौकिक ग्रामीण भागापुरता मर्यादित न ठेवता तो महानगरापर्यंत पोहोचविण्यातही मुकेश गेडाम यांचे योगदान उल्लेखनीय आहे. मुलुंड येथील ९९ व्या नाट्य संमेलनात महाकवी कालिदास रंगमंदिरात ‘फाटका संसार’ या नाटकातून ध्येयवेड्या अशोकची भूमिका साकारत त्यांनी झाडीपट्टीच्या अभिनयाची ताकद मुंबईच्या रसिकांसमोर दाखवून दिली.
अभिनयासोबत लेखन आणि दिग्दर्शन
मुकेश गेडाम यांची प्रतिभा केवळ अभिनयापुरती मर्यादित नाही. ‘हंबरते गाय वासराची’, ‘आघात’, ‘बंदिवान मी या जन्माची’, ‘लाडकी’ आदी नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.
‘अग्नितांडव’ आणि आगामी ‘नरकवास’ या नाटकांच्या माध्यमातून त्यांनी लेखणीची ताकदही सिद्ध केली आहे. सामाजिक वास्तव, नात्यांमधील दुरावा, स्वार्थ, प्रेम, फसवणूक, छळ, शोषण, बहिष्कृतता आणि कटकारस्थान अशा ज्वलंत विषयांना त्यांनी नाट्यरूप दिले आहे.
‘अग्नितांडव’मधून सामाजिक प्रश्नांना भिडताना महिला सुरक्षिततेचा संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे नाटक हे केवळ मनोरंजन न राहता समाजाला आरसा दाखविणारे माध्यम ठरते.
कला म्हणजे प्रबोधनाची शक्ती
‘कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे’, या विचारातून मुकेश गेडाम यांनी आपल्या कलासाधनेला सामाजिक आशयाची जोड दिली. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा पुढे नेत खंजेरी भजन, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी गावागावांत जनजागृती केली.
सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत त्यांनी कलेला समाजाशी जोडण्याचे काम केले आहे. डोंगरगाव येथे सरपंचपदावर असताना समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल स्वच्छ भारत मिशनअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याचा गौरवही त्यांच्या कार्याला लाभला.
पुरस्कारांनी गौरवलेला रंगसाधक
दीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या वतीने ‘समाजभूषण संगीतसम्राट हिरासुका पुरस्कार’, राजश्री प्रोडक्शनचा झाडीपट्टी उत्कृष्ट कलावंत पुरस्कार, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा झाडीपट्टी ज्येष्ठ कलावंत सन्मान, महाराष्ट्र शासन आयोजित झाडीपट्टी संमेलनातील ज्येष्ठ कलावंत सन्मान, वडसा नाट्यसंमेलनातील उत्कृष्ट खलनायक पुरस्कार, आष्टी येथील आदिवासी साहित्य संमेलनातील उत्कृष्ट कलावंत तथा वक्ता सन्मान आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा ‘ज्येष्ठ कलावंत’ पुरस्कार अशा विविध सन्मानांनी त्यांच्या कलेचा गौरव झाला आहे.
बालकलाकार ते बहुआयामी रंगसाधक
१९८८ मध्ये बालकलाकार म्हणून रंगभूमीवर पडलेले पहिले पाऊल आज एका अनुभवी आणि बहुआयामी रंगसाधकाच्या प्रवासात परिवर्तित झाले आहे. अभिनयातून पात्रांना जिवंत करणारे, लेखणीतून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे, दिग्दर्शनातून रंगमंचाला आकार देणारे, गायन-वादनातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे आणि प्रबोधनातून समाजाला जागविणारे मुकेश गेडाम हे झाडीपट्टी रंगभूमीचे खरे बहुआयामी रंगसाधक ठरतात.
झाडीपट्टीच्या मातीत जन्मलेली ही कला महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहोचविण्याचे काम त्यांच्या रंगप्रवासातून घडत आहे. नव्या पिढीतील कलाकारांना दिशा देत रंगदेवतेची साधना अशीच अखंड सुरू राहो आणि त्यांच्या अभिनय, लेखन, दिग्दर्शन व सामाजिक प्रबोधनाच्या कार्यातून झाडीपट्टी रंगभूमीला नवी उंची मिळो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
— प्रा. राजकुमार मुसणे
मो. 9423639532
