१७ दिवसांपासून तीन गावे अंधारात; विद्युत विभागाच्या दुर्लक्षाचा नागरिकांना फटका
कोरेपल्ली, कवटाराम, कप्पेवंचा गावकऱ्यांचा संताप; तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
प्रतिनिधी तिरुपति मडावी
अहेरी तालुका : ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ताडगुडा ते कोरेपल्ली मार्गावरील तब्बल पाच विद्युत खांबे मोडून पडले. या घटनेला तब्बल १७ दिवस उलटूनही विद्युत विभागाकडून दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने कोरेपल्ली, कवटाराम आणि कप्पेवंचा या गावांतील नागरिक गेल्या १७ दिवसांपासून अंधारात जीवन जगत आहेत.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी अंधार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल चार्जिंग, विद्यार्थ्यांच्या अभ्यासासह दैनंदिन कामकाजावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
या गंभीर परिस्थितीची माहिती गावकऱ्यांनी वारंवार विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, १७ दिवस उलटूनही विद्युत विभागाकडून ठोस हालचाल होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुरुस्तीबाबत विचारणा केली असता, “ट्रॅक्टर मिळत नाही, लेबर उपलब्ध नाही” अशी कारणे सांगितली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोडलेले विद्युत खांबे उभारून वीजपुरवठा पूर्ववत करण्याऐवजी कारणे सांगण्यातच विभाग वेळ घालवत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
वीजपुरवठा ही नागरिकांची मूलभूत गरज असताना तीन गावे सलग १७ दिवस अंधारात ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मोडलेले विद्युत खांबे बसवावेत आणि कोरेपल्ली, कवटाराम व कप्पेवंचा गावांचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
