स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही चिखलातून पायपीट!
आलापल्ली–चिरेपल्ली रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजुरीची मागणी
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन; अतिसंवेदनशील भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही
गडचिरोली | एटापल्ली | तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
देशाने स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सव साजरा केला, तरीही दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न कायम असल्याचे चित्र समोर येत आहे. आलापल्ली ते चिरेपल्ली गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था आणि पावसाळ्यात चिखलातून करावी लागणारी पायपीट यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब पुढे आली आहे.
आलापल्ली–चिरेपल्ली मार्गाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः पावसाळ्यात मार्गावर चिखल आणि निसरडेपणा निर्माण होत असल्याने प्रवास अधिक कठीण होतो. परिणामी शिक्षण, आरोग्यसेवा, शेतीविषयक कामे आणि बाजारपेठेत पोहोचताना नागरिकांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्ते ही मूलभूत गरज असून, आलापल्ली ते चिरेपल्ली गावापर्यंतचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात अहेरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी एकता मंचचे युवा नेते कैलाशभाऊ कोरेत यांच्या नेतृत्वाखाली आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन सादर करण्यात आले. या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण करावे आणि रस्त्याच्या मंजुरीसाठी प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली.
अतिसंवेदनशील भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी प्रयत्न
निवेदनकर्त्यांनी मांडलेल्या रस्त्याच्या समस्येची दखल घेत, अतिसंवेदनशील भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
आता या मार्गाच्या प्रत्यक्ष पाहणीसह तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया कधी पूर्ण होणार आणि रस्त्याच्या कामाला कधी सुरुवात होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित विभागाने या मागणीची दखल घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
