जवेली गावात क्रेश (पाळणाघर) केंद्र सुरू होणार!
टाटा ट्रस्ट्स आणि मोबाईल क्रेचेसचा पुढाकार; बालकांच्या सुरक्षित संगोपनासह सर्वांगीण विकासाला मिळणार चालना
तालुका प्रतिनिधी : गिरीश डी. नरोटे
जवेली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली : दुर्गम भागातील बालकांना सुरक्षित संगोपन आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एटापल्ली तालुक्यात क्रेश (पाळणाघर) केंद्रे सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. टाटा ट्रस्ट्स आणि मोबाईल क्रेचेस यांच्या समन्वयातून तसेच जिल्हा व तालुका प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने जवेली येथे मोबाईल क्रेचेस संस्था आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने समुदाय बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत संस्थेचे सदस्य शरद यादव आणि पल्लवी झरकर यांनी क्रेश केंद्राचा उद्देश, संस्थेचे कार्य तसेच बालकांच्या सुरक्षित संगोपनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली.
लहान बालकांना सुरक्षित वातावरण, योग्य देखभाल आणि विकासासाठी पोषक संधी मिळणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर पाळणाघर केंद्राच्या माध्यमातून बालकांच्या संगोपनाला मदत होणार असून, या उपक्रमात ग्रामस्थांचा सहभागही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बैठकीदरम्यान केंद्राचे महत्त्व, बालकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा आणि समुदायाच्या सहभागाबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला गावचे पोलीस पाटील, वॉर्ड सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवेली येथे क्रेश केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गावात लवकरच हे केंद्र सुरू करण्याचे नियोजन असून, त्यातून स्थानिक बालकांना सुरक्षित संगोपन आणि सर्वांगीण विकासासाठी मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांच्या विकासासाठी अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास बालसंगोपनाला बळ मिळण्यासोबतच कुटुंबांनाही दिलासा मिळू शकतो.
