पंचशील बौद्ध विहार बुर्गी येथे अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!
ध्वजारोहणातून बुद्ध, धम्म आणि समतेच्या विचारांचा जागर; बौद्ध उपासक-उपासिकांची मोठी उपस्थिती
प्रतिनिधी : सुगत उराडे
बुर्गी, दि. २० ऑक्टोबर २०२६
बुर्गी : तथागत गौतम बुद्धांच्या समतावादी विचारांचा जागर आणि भारतीय इतिहासातील धम्मक्रांतीचे स्मरण करत बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. पंचशील बौद्ध समाज मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ध्वजारोहण करून बुद्ध, धम्म आणि समतेच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्ध उपासक-उपासिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भिकाजी झाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी तथागत गौतम बुद्धांच्या मानवतावादी शिकवणीचे स्मरण केले. तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा अंगीकार करून समाजात शांतता, सलोखा आणि बंधुभाव टिकवून ठेवण्याचा संदेश दिला.
धम्मचक्र परिवर्तन दिन हा सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारा महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन भारतीय समाजात समता आणि मानवी प्रतिष्ठेच्या विचारांना नवी दिशा दिली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणातून सामाजिक विषमता दूर करून समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.
सम्राट अशोक विजयादशमीच्या निमित्ताने भगवान बुद्धांचा शांती, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित झाली. बुद्धांच्या धम्मविचारांचा प्रसार करून सामाजिक एकता, बंधुभाव आणि मानवतेची मूल्ये जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला भिकाजी झाडे, व्यंकटेश डोनारकर, विनोद दुर्गे, दिनेश दुर्गे, विभाकर झाडे, घनश्याम ओंडरे, प्रशांत दुर्गे, मधुकर डोनारकर, प्रफुल दुर्गे, संतोष झाडे, निलेश झाडे, प्रेमिला ओंडरे, अरुणा झाडे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम ओंडरे यांनी केले, तर व्यंकटेश डोनारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. बुद्ध, धम्म आणि समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
