बाबांच्या विकासदृष्टीला मोठे यश; २३०० कोटींच्या निधीतून अहेरी विधानसभा क्षेत्रात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात!’
अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, विधानसभा क्षेत्रातील रस्ते विकासासाठी तब्बल २३०० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. या निधीतून मुलचेरा, एटापल्ली, कोरची व अहेरी परिसरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण तसेच पूल व मोऱ्यांची उभारणी करण्यात येणार असून, संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
दीर्घकाळापासून अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या मुलचेरा–आलापल्ली–अहेरी–व्यंकटापूर–मोयाबिनपेठा–बेजूरपल्ली ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी ला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण मार्गाच्या उन्नतीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग ३७० च्या कि.मी. ६९/०० ते ८१/६७० आणि ८१/६७० ते १२९/६७० या टप्प्यातील रस्त्यांचे दर्जेदार बांधकाम करण्यात येणार आहे.
याशिवाय देवदा–बोलपल्ली–एटापल्ली–गट्टा–कसनसूर (राज्यमार्ग ३८१) या मार्गासाठी सुमारे ६७३ कोटी रुपये, तर कोरची–येडमपायली–चोखेवाडा–एटापल्ली–आलापल्ली (राज्यमार्ग ३६३) या महत्त्वाच्या मार्गासाठी ५९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामांसह एकूण जवळपास २३०० कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील नागरिकांसाठी हा विकास आराखडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या रस्त्यांच्या उन्नतीकरणामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार असून व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वाहतूक अडचणींवर कायमस्वरूपी उपाय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी शासन स्तरावर केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निधी मंजूर झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुलचेरा तालुक्यासह संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्राच्या विकासाला नवे बळ मिळणार असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“विकासदृष्टीला मिळाले यश”
“रस्ते हेच विकासाचे मुख्य साधन असून मंजूर झालेल्या या कामांमुळे मुलचेरा, एटापल्ली, गट्टा कसनसुर आणि अहेरी परिसराच्या विकासाचा वेग अनेक पटींनी वाढणार आहे. दुर्गम भागातील जनतेच्या प्रगतीचा मार्ग आता अधिक सुकर होणार आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
‘बाबांच्या विकासदृष्टीला मोठे यश; २३०० कोटींच्या निधीतून अहेरी विधानसभा क्षेत्रात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात!’
