सर्वांच्या सहकार्यानेच मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी होईल
अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांचे आवाहन
प्रतिनिधी : गिरीश नरोटे | आलापल्ली | दि. 26 जुलै 2026
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी केले.
आलापल्ली येथील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय येथे मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जनजागृती सभा तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी मंचावर नायब तहसीलदार प्रतीक आढाव, मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, रायू काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत, तालुका अध्यक्ष मुन्ना शेख, सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अकनपल्लीवार, ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अलोने, शारदाताई कडते, सुमनताई खोब्रागडे, संतोष अर्का, सोमेश्वर रामटेके, स्वामी वेलादी, पराग पांढरे, वासुदेव पेदीवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे उद्दिष्ट, नागरिकांनी करावयाची नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल, नवीन मतदारांची नोंदणी तसेच अपात्र नोंदी वगळण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी सांगितले की, आलापल्ली परिसरातील मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शासकीय स्वस्त धान्य दुकानदार, प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व बूथस्तरीय अधिकारी व प्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी आणि कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी महसूल विभागामार्फत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभेच्या शेवटी उपस्थितांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
