कोंजेड ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम दिमाखात संपन्न
कोंजेड : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोंजेड ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात व दिमाखात पार पडला. ग्रामपंचायत कोंजेडचे सरपंच श्याम मडावी यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरपंच श्याम मडावी यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. हा दिवस केवळ ब्रिटिश राजवटीच्या समाप्तीची आठवण करून देणारा नसून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देणारा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण व सामाजिक समतेसाठी उभारलेला लढा, सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेला संघर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला दिलेले समान अधिकार यांचा उल्लेख करत त्यांनी सामाजिक समता व संविधानिक मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
“तिरंगा हातात घेणे सोपे आहे; मात्र संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये आपल्या आचरणात आणणे हीच खरी देशभक्ती आहे,” असे प्रतिपादन सरपंच श्याम मडावी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला उपसरपंच सीताराम मडावी, कोतवाल राजेश मडावी, अनिल वेलादी, गोपाल सोयाम, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामपंचायत शिपाई राजेश मडावी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण ग्रामपंचायत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशाच्या एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संदेश दिला.
— जितेंद्र दागम
अहेरी तालुका सहसचिव तथा प्रतिनिधी
मो. ९०३२४०१७२०
