जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा; आठ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत वर्ग, मात्र कायमस्वरूपी शिक्षक केवळ पाच; वसतिगृहातील सुविधांचाही अभाव
तालुका प्रतिनिधी : सुगत उराडे
जांबिया, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली | दि. ७ ऑक्टोबर २०२६
एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत जांबिया अंतर्गत येणाऱ्या टिटोला, पामजीगुडा, झारेवाडा, जांबिया, मोडास्के, पुस्के, गट्टगुडा आणि अडंगे या आठ गावांच्या संयुक्त पारंपारिक ग्रामसभेने बुधवारी (दि. ७) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जांबिया येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेतील शिक्षकांची कमतरता तसेच वसतिगृहातील विविध सुविधांचा अभाव असल्याचे ग्रामसभेच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.
१ ली ते १२ वीपर्यंत वर्ग; कायमस्वरूपी शिक्षक मात्र पाच
शाळेत इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू असताना कायमस्वरूपी शिक्षकांची संख्या केवळ पाच असल्याचे ग्रामसभेने नमूद केले. इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंत एकही कायमस्वरूपी शिक्षक नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याचे ग्रामसभेचे म्हणणे आहे.
ग्रामसभेच्या पाहणीनुसार, काही विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेबाबतही अडचणी असल्याचे निदर्शनास आले. इयत्ता ८ वी ते १० वीकरिता केवळ तीन शिक्षक, तर इयत्ता ११ वी ते १२ वीकरिता दोन शिक्षक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षकांची अपुरी संख्या असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, त्याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवरही होत असल्याचा दावा संयुक्त ग्रामसभेने केला आहे.
वसतिगृहातील सुविधांबाबतही ग्रामसभेचे प्रश्न
शाळेतील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या सुविधांबाबतही ग्रामसभेने प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलींच्या वसतिगृहासाठी अधीक्षिका, तर मुलांच्या वसतिगृहासाठी अधीक्षक नसल्याचे ग्रामसभेने निदर्शनास आणले.
मुलींच्या वसतिगृहात गाद्यांचा अभाव, काही पंखे बंद असणे तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे ग्रामसभेने सांगितले. तर मुलांच्या वसतिगृहात शौचालयांची कमतरता असल्याचेही नमूद करण्यात आले. डबल बेडची व्यवस्था असल्याने टेबल फॅनची आवश्यकता असल्याचे ग्रामसभेचे म्हणणे आहे.
आठ गावांची तातडीने शिक्षक नियुक्तीची मागणी
शाळेतील शैक्षणिक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आठ गावांच्या संयुक्त पारंपारिक ग्रामसभेने तातडीने आवश्यक शिक्षक व वसतिगृह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
ग्रामसभेने केलेल्या मागणीनुसार ७ प्राथमिक शिक्षक, २ माध्यमिक शिक्षक, २ ज्युनियर कॉलेज शिक्षक तसेच १ अधीक्षक आणि १ अधीक्षिका, अशा आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आठ दिवसांची मुदत; अन्यथा धरणे आंदोलन
शाळेतील शिक्षकांचा तुटवडा आणि वसतिगृहातील सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी ग्रामसभेने केली आहे. प्रशासनाने आठ दिवसांच्या आत शिक्षकांची नियुक्ती केली नाही, तर आठही गावांतील नागरिकांना एकत्र करून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संयुक्त पारंपारिक ग्रामसभेने दिला आहे.
दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेता प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि शिक्षकांची रिक्त पदे कधी भरली जातात, याकडे आता आठही गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
— आठ गावांची संयुक्त पारंपारिक ग्रामसभा, जांबिया पंचायत क्षेत्र
