एटापल्लीतील मुख्य रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त!
लॉयड्स मेटल्सचा सामाजिक बांधिलकीतून पुढाकार; रस्त्याच्या दुरवस्थेने त्रस्त नागरिकांना दिलासा
प्रतिनिधी : सुगत उराडे
एटापल्ली | दि. १० ऑक्टोबर २०२६
एटापल्ली शहरातील मुख्य रस्त्याच्या अत्यंत बिकट झालेल्या अवस्थेतून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून पुढाकार घेत मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती व बांधकामाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
एटापल्ली हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर दुचाकी, चारचाकी आणि प्रवासी वाहनांची ये-जा सुरू असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर पडलेले खड्डे आणि झालेली दुरवस्था यामुळे अपघातांचा धोका वाढला होता. तसेच वाहनचालक व पादचाऱ्यांना प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर, लॉयड्स मेटल्सने केवळ औद्योगिक विकासावर भर न देता सामाजिक बांधिलकी जपत या समस्येची दखल घेतली. शहराच्या मूलभूत सुविधेसाठी पुढाकार घेत कंपनीने या रस्त्याचे काम सुरू केले आहे. कंपनीच्या या लोकोपयोगी भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची मागणी
रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. सदर काम अत्यंत दर्जेदार आणि ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण केले जावे, अशी अपेक्षा एटापल्लीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
एकूणच, लॉयड्स मेटल्सच्या पुढाकारामुळे एटापल्लीकरांच्या दीर्घकालीन समस्येवर अखेर मार्ग निघाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
