प्रशासनाची वाट न पाहता युवकांनी हाती घेतली स्वच्छतेची धुरा!
पंदेवाही (स) येथे युवा पिढीचा प्रेरणादायी उपक्रम; संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या विचारांना उजाळा
प्रतिनिधी : गिरीष डी. नरोटे
एटापल्ली : “आपलं गाव, आपली माणसं आणि आपली जबाबदारी” हा प्रेरणादायी संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या पंदेवाही (स) गावातील युवक-युवतींनी स्वच्छता अभियान राबविले. अनेक दिवसांपासून गावातील मुख्य रस्त्यांवर साचलेला कचरा आणि अस्वच्छतेकडे लक्ष वेधत युवा पिढीने स्वतः पुढाकार घेऊन गावातील रस्त्यांची स्वच्छता केली.
गावातील मुख्य रस्त्यांवर अनेक दिवसांपासून कचरा साचून राहत होता. या समस्येवर प्रशासनाकडून स्वच्छता कधी होणार, याची वाट पाहण्याऐवजी गावातील युवक-युवतींनी एकत्र येत स्वच्छतेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. हातात झाडू घेऊन त्यांनी रस्त्यांवरील कचरा गोळा केला आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले.
“प्रशासनाची वाट कशाला पाहायची? आपल्या गावाच्या स्वच्छतेची सुरुवात आपणच करूया!” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून युवकांनी गावाच्या विकासासाठी सामूहिक सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे दाखवून दिले.
विशेष म्हणजे, या उपक्रमातून युवा पिढीने थोर समाजसुधारक संत गाडगेबाबांच्या स्वच्छता, श्रमदान आणि समाजप्रबोधनाच्या विचारांची पुन्हा एकदा आठवण करून दिली. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेला केवळ सवय न मानता सामाजिक जबाबदारीचे स्वरूप दिले होते. त्याच विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पंदेवाही येथील युवक-युवतींनी कृतीतून स्वच्छतेचा संदेश दिला.
गाव स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक गावकऱ्याचे कर्तव्य आहे. गावातील नागरिकांनीही या उपक्रमातून प्रेरणा घेऊन नियमित स्वच्छता राखावी, कचरा रस्त्यावर टाकू नये आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता जपावी, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.
पंदेवाहीतील युवा पिढीचा हा उपक्रम केवळ रस्ते स्वच्छ करण्यापुरता मर्यादित नसून, गावाप्रती असलेली आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक जबाबदारीचे जिवंत उदाहरण ठरला आहे. गाव बदलायचे असेल, तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते, हे या युवक-युवतींनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.
